साळी शुद्धीवर आली आणि भाऊजीचा "गेम' फसला! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीला राजस्थान येथे एका मुलाशी लग्न लावून देत असल्याचे सांगून भाऊजीसोबत येण्यास सांगितले. त्यानुसार हरिराम कंडेरा तुकुम परिसरातील तिच्या आत्याच्या घरी आला.

चंद्रपूर : बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरविल्याने आत्याकडे राहणाऱ्या साळीला गुंगीचे औषध देऊन राजस्थानात पळवून नेऊन तेथे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न लावून देण्याचा डाव तिच्या भाऊजीने आखला होता. त्यात तो काही अंशी यशस्वीसुद्धा झाला. मात्र, औषधाची गुंगी उतरल्यानंतर पीडित मुलीने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या मदतीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून बदमाश भाऊजीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 

अवश्य वाचा- धक्कादायक...! हरभऱ्याचे आमिष दाखवून त्याला नेले शेतात आणि...

हरिराम कंडेरा असे पोलिसांनी अटक केलेल्या भाऊजीचे नाव आहे. पीडित मुलीला दोन बहिणी असून, त्या मूळच्या वणी येथील रहिवासी आहेत. लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिन्ही बहिणींचा सांभाळ काही वर्षे मावशी, तर काही वर्षे आत्या करीत आहे. यातील मोठ्या बहिणीचे लग्न राजस्थान येथील हरिराम कंडेरा याच्याशी झाले. सात वर्षांपासून मोठी बहीण राजस्थानला राहते. तर, अन्य दोन बहिणी तुकुम परिसरातील आत्याकडे राहतात. 

गुंगीचे औषध देऊन केले बेशुद्ध

मागील आठवड्यात मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीला राजस्थान येथे एका मुलाशी लग्न लावून देत असल्याचे सांगून भाऊजीसोबत येण्यास सांगितले. त्यानुसार हरिराम कंडेरा तुकुम परिसरातील तिच्या आत्याच्या घरी आला. पीडित मुलगी तेव्हा घरी एकटीच होती. याचा फायदा घेत कंडेरा याने तिला गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेत तिला राजस्थानमध्ये नेऊन लग्न लावून देण्याचा त्याचा डाव होता. मात्र, काही वेळानंतर गुंगीचा प्रभाव उतरल्यानंतर तिच्या लक्षात सारा प्रकार आला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी हरिराम कंडेरा याला अटक करून गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister in law came in conscious and Brother in law failed to marry her