अंगावर पेट्रोल टाकून बहिणीचा खून? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करण्यात आला, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला. काल, सोमवारी दुपारी महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

अमरावती - बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करण्यात आला, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला. काल, सोमवारी दुपारी महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. 

राखी मनोज दुबे (वय 35, रा. संजय गांधीनगर नं. 2) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (ता. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. राखीला काल सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. बहीण राखी दुबे व सासरे राजेंद्रप्रसाद दुबे (वय 60) या दोघांनाही इर्विन रुग्णालयात एकाचवेळी दाखल केले, असे पोलिसांनी सांगितले. 

काही दिवसांपासून राखीचे सासू-सासरे व दीर तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ करीत होते. त्यांनीच अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले, असा तक्रार भाऊ मोहन कमलाप्रसाद पांडे (रा. शेगाव, जि. बुलडाणा) यांनी राखीच्या मृत्यूनंतर फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदवली. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 

भावाच्या तक्रारीनंतर नातेवाइकांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. 
-आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sister murder Allegations of brother