वैद्यकीय सेवा ठरली देवदूत; मेळघाटातील सहा महिन्यांच्या चिमुकल्याला मिळाले पुनर्जन्म

Six month old child from Melghat got a new life
Six month old child from Melghat got a new life
Updated on: 

अमरावती : मेळघाटात आरोग्याबाबत नेहमीच ओरड होत असते. मात्र, या नकारात्मक वातावरणातसुद्धा आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीतून बालकाला नवजीवन मिळाले. ‘प्ल्युरल इन्फ्युजन’चे निदान झालेल्या मेळघाटातील सहा महिन्यांच्या राकेश कासदेकर या चिमुकल्यावर आरोग्य विभागाच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने पुनर्जन्म मिळाला आहे. वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील टेम्ब्रु येथील अवघ्या सहा महिन्याच्या राकेश रामा कासदेकर याला १४ जानेवारी रोजी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय उपचारांसाठी राकेशचे कुटुंबीय तयार नव्हते. ही माहिती कळताच गावातील आरोग्य सेविका स्मीता राऊत, आशा सेविका सुनीता कासदेकर यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करून बाळाची डॉ. सागर कोगदे यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीअंती बाळाची आरोग्य स्थिती चांगली नसल्याचे आढळले. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलावून चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी राकेशच्या आई-वडिलांना धीर व विश्वास दिला. चुर्णी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दारसवार यांच्या सल्ल्यानुसार बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यासाठी सर्व संदर्भ सेवा कुटुंबाला उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात भरती झाल्यावर बालरोगतज्ज्ञामार्फत बाळावर तत्काळ वैद्यकीय उपचार व तपासणी सुरू करण्यात आली. बाळाच्या छातीत प्ल्युरल इन्फ्युजन झाल्याचे निदान झाले.

बाळाला सगळ्या प्रकारची प्रतिजैविके देऊनही प्रकृतीत सुधारणा दिसून येत नव्हती. प्रकृती जास्त गंभीर होत असल्याचे दिसून येत असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमणे यांना पाचारण करण्यात येऊन मार्गदर्शनात शस्त्रक्रिया करून उपचार करण्याचे ठरविले. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. संतोष राऊत यांनी यशस्वी केली.

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल

आरोग्य यंत्रणेने असेच कार्यतत्पर राहून कामे करावीत. आरोग्य विभागावर मेळघाटातील रहिवाशांचा विश्वास निर्माण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कार्यक्षेत्रात भेटी देऊन समुपदेशन करावे. या माध्यमातून मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com