
जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, राळेगाव व मारेगाव या सहा नगरपंचायतींचा कार्यकाळ गेल्या 26 नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त झाला आहे. तेव्हापासून या ठिकाणी प्रशासक कामकाज पाहत आहेत.
यवतमाळ : पाच वर्षांचा कार्यकाळ झाल्याने जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतींमधील निवडणुकींसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या सोमवारी (ता.15) प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर एक मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये सहा नगरपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - वाघ बघायला जायचंय? उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात चला; ५ नव्या पाहुण्यांचं दर्शन
जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, राळेगाव व मारेगाव या सहा नगरपंचायतींचा कार्यकाळ गेल्या 26 नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त झाला आहे. तेव्हापासून या ठिकाणी प्रशासक कामकाज पाहत आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नगरपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये आपली सत्ता यावी, यासाठी उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2021पर्यंत अद्ययावत विधानसभेची मतदारयादी वारण्यात येणार आहे. तशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. सहा नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी येत्या एक मार्च 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणतः: मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सहा नगरपंचायतींसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. परिणामी जिल्ह्यात लवकरच सहकार व नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भातखळकरांनी घेतले मंत्र्याचे नाव, 'मुख्यमंत्री 'राठोडगिरी...
15 फेब्रुवारीपासून हरकती घेता येणार -
राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारी (ता.15) प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 ते 22 फेब्रुवारी प्रारूप मतदारयादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. एक मार्चला अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर आठ मार्चला मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.