त्वचा दानातून वाचला उद्‌ध्वस्त होणारा संसार

सोमवार, 13 ऑगस्ट 2018

त्वचा दानातून वाचला उद्‌ध्वस्त होणारा संसार
केवल जीवनतारे

त्वचा दानातून वाचला उद्‌ध्वस्त होणारा संसार
केवल जीवनतारे
नागपूर : वर्षभरापूर्वीची घटना आहे... गॅसचा भडका उडाल्याने चेहरा आणि दोन्ही हात भाजले. रुग्णालयात उपचार झाले. चेहरा विद्रूप झाला होता. बघवत नव्हते. त्वचा उघडी पडली होती. जगण्यापेक्षा मृत्यूला जवळ करावे असेच मन सांगत होते. आता बरी होणार नाही, ही वेदना घेऊन रुग्णालयाच्या खाटेवर जगत असतानाच दानातून मिळालेल्या त्वचेने जखमा बऱ्या झाल्या. उद्‌ध्वस्त होणारा संसार वाचला. पती, दोन लहान मुले असा फुललेला गोड संसार आनंदाने पुन्हा सुरू झाला... या माउलीने आलेल्या अनुभवांना, भावनांना वाट मोकळी करून दिली. जळितांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी नागपुरातील त्वचा पेढी वरदान ठरत आहे.
आरेंज सिटीत हॉस्पिटलमध्येच या माउलीवर उपचार झाले. भाजल्यामुळे चेहरा विद्रूप झाला होता, मानसिकदृष्ट्या खचली होती. परंतु, त्वचादानातून या माउलीचा संसार वाचला. उपराजधानीत 33 लोकांनी दिलेल्या त्वचादानातून 32 जणांना लाभ दिला गेला. यात अनेकांचे प्राण वाचवण्यात नागपुरातील त्वचापेढीला यश आले.
जळीत रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणातून (होमोग्राफ्टिंग) वाचवणे शक्‍य आहे. भाजल्यामुळे देशात 30 लाख लोकं जखमी होतात. यातील 10 लाख लोक मृत्युमुखी पडतात. अनेकांना कायमचे अपंगत्व, विद्रूपता येते. स्वयंपाक करताना गॅस, स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे भाजणे, विजेचा अपघात, आग लागल्यामुळे, फटाक्‍यांमुळे, उकळत्या पाण्यामुळे त्वचा भाजते, अशा जळीत रुग्णांचे त्वचादानातून त्यांचे जीव वाचवता येतात. भाजल्यानंतर त्वचा उघडी पडते. संसर्ग होतो. जखम चिघळते आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो. त्वचादानामुळे 60 टक्के लोकांचे जीव वाचवून त्यांच्या जळीत आयुष्यावर त्वचादानातून फुंकर घालता येते, असे प्लॅस्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले. ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि नॅशनल बर्न सेंटर (मुंबई) यांच्या सहकार्याने नागपुरात पहिली त्वचा पेढी (स्किन बॅंक) सुरू आली असून सध्या त्वचादानाचा टक्का वाढला आहे.
अवयवदानात महाराष्ट्र चौथा
तमिळनाडू अवयवदानात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ केरळ तर तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्वचादानातही तमिळनाडूतील कोईम्बतूर पुढे आहे. एकाच वर्षात 2017 मध्ये 100 जणांनी त्वचा दान केली. मुंबईतही दर आठवड्यात 5 ते 10 व्यक्तींचे त्वचादान होते. देशपातळीवर 2 लाख किडनीची तर 50 हजार यकृताच्या तर 2 हजार हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

मृत्यूनंतरच्या त्वचा दानाबाबत समाजात गैरसमज असल्याने अल्प प्रतिसाद आहे. त्वचा दात्याची संपूर्ण त्वचा काढली जात नाही, केवळ एक अष्टमांश (त्वचेवरील पापुद्रा) त्वचा काढली जाते. यामुळे मृत व्यक्ती विद्रूप दिसत नाही. विकृतीशिवाय 30 मिनिटांत त्वचादान होते.
-डॉ. समीर जहागीरदार, प्लॅस्टिक सर्जन, नागपूर.

Web Title: Skin donation save marriage

टॅग्स