वॉशिंग लाइनचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

 रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसाठी नव्यानेच उभारलेल्या वॉशिंग लाइनचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास इतवारी रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली. सुदैवाने अन्य कामगार बचावले.

नागपूर - रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसाठी नव्यानेच उभारलेल्या वॉशिंग लाइनचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास इतवारी रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली. सुदैवाने अन्य कामगार बचावले.

सुभाष राजकुमार नागपुरे (२५) असे मृताचे नावे आहे. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील ढाकणी येथील रहिवासी आहे. इतवारी रेल्वेस्थानकाच्या मागील भागात मालधक्का परिसरात रेल्वेगाड्या धुण्यासाठी वॉशिंग लाइनचे काम सुरू होते. अलीकडेच काम पूर्ण झाले असून, पेंटिंगचे काम करण्यात येत होते. रविवारी एक महिला आणि दोन पुरुष असे तीन मजूर घटनास्थळी होते. सुभाष पेंन्टिग करीत होता. सोबतच असणारे महिला आणि अन्य कामगार बाजूला होते. त्याचवेळी स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला. सुभाषला बाहेर निघण्याचीही संधी मिळाली नाही. तो आत अडकला असल्याने इतरांनी जोराने आरडाओरड केली. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅब तोडून मलबा हटविण्यासाठी मशीन बोलावण्यात आली. मशीनच्या मदतीने मलबा हटविण्यात आला. मात्र, तोवर सुभाषचा मृत्यू झाला होता. 

या कामाचे कंत्राट टेक्‍नोक्रेट कंपनीचे मनोज अरोरा यांना मिळाले असल्याचे सांगितले जाते. नवनिर्मित स्लॅप कोसळल्याने रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दपूम रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) त्रिपाठी यांनी ही गंभीर घटना असून चौकशी होणार असल्याचे सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवच्छिेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवून दिला. सुभाषच्या नातेवाइकांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.  

थोरल्याच्या लग्नापूर्वी धाकट्यावर काळाचा घाला
सुभाषच्या कौटुंबिक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी त्याच्या मोठ्या भावाचे लग्न आहे. त्यासाठी पेंटिंगचे काम आटोपून तो उद्या, सोमवारीच गावी जाणार होता. पण,  त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. थोरल्याच्या लग्नापूर्वी धाकट्या भावावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागपुरे कुटुंबीयांवर आली.

Web Title: Slab collapses in nagpur