भेल समोरच झोपले आंदोलक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

साकोली (जि. भंडारा) : लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे विदर्भाचा महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्पाचे काम सहा वर्षांपासून बंद पडलेले आहे. या प्रकल्पासाठी अनेकांच्या जमिनी गेल्याने शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, प्रकल्प सुरूच न झाल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या नेतृत्वात झोपा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंडीपार, बाह्मणी व खैरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगार सहभागी झाले होते.

साकोली (जि. भंडारा) : लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे विदर्भाचा महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्पाचे काम सहा वर्षांपासून बंद पडलेले आहे. या प्रकल्पासाठी अनेकांच्या जमिनी गेल्याने शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, प्रकल्प सुरूच न झाल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या नेतृत्वात झोपा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंडीपार, बाह्मणी व खैरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगार सहभागी झाले होते. महिन्याभरात भेल प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
तत्कालीन अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने भेल प्रकल्पाची पायाभरणी करून थाटात उद्‌घाटन करण्यात आले. या प्रकल्पावर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर माजी खासदार नाना पटोले, विदर्भाचे हेवीवेट मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सहा वर्षांत काहीच केले नाही. लोकप्रतिनिधींच्या राजकीय वर्चस्वाच्या संघर्षामुळे हा प्रकल्प मागील सहा वर्षांपासून बंद पडलेला आहे. परिसरातील बेरोजगार व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
केंद्र सरकारकडे दोन हजार 700 कोटी रुपयांचे अनुदान सौरऊर्जा प्लेटकरिता मंजूर झाले नाही. हे अनुदान आज भेल प्रकल्पाला स्थानांतरित करण्यात आले; तर उद्या सौरऊर्जा प्लेटचा प्रकल्प सुरू होण्यास वेळ लागणार नाही. खासदार सुनील मेंढे आपल्या सत्कार समारंभात भेल प्रकल्प सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, ते काय प्रयत्न करतात याची स्थानीय बेरोजगार व प्रकल्पग्रस्त शेतकरी वाट पाहात आहेत. साकोलीचे तहसीलदार तेढे यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र, राज्य, खासदार, आमदाराचा निषेध करण्याच्या घोषणा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sleeping protesters in front of BHEL