दीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना याचा लाभ होणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना याचा लाभ होणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
महापालिकेत ते पत्रकारांशी बोलत होते. महापालिका व नासुप्रच्या जागेवरील सरस्वतीनगर, फकीरवाडी, रामबाग, जाटतरोडी, कुंदनलाल गुप्ता वाचनालयामागील वस्ती, बोरकरनगर, बन्सोड मोहल्ला झोपडपट्टी, काफला वस्ती, इमामवाडा-2 येथील नागरिक तसेच खामला येथील सिंधी कॉलनीतील रहिवाशांना पट्टे वाटप करण्यात येतील. इतर सात झोपडपट्ट्या रेल्वे लाइनमुळे बाधित आहेत. परंतु, त्यांनाही पट्टे वाटप होणार आहे. पाचशे वर्गफूटपर्यंत जागा असलेल्यांना केवळ विक्रीपत्राचा खर्च येईल. इतर खर्चातून त्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, पाचशे वर्गफूटपेक्षा जास्त जागा असलेल्या पट्टेधारकास संपूर्ण खर्च करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रजिस्ट्रीची संख्या कमी असल्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, अनेकांनी रजिस्ट्रीचे पैसे माफ करा, अशी मागणी केली. याशिवाय रजिस्ट्रीसाठी कर भरल्याची पावती आवश्‍यक आहे. अनेकांकडे कर थकीत आहे. त्यामुळेही रजिस्ट्री झाली नसल्याने संख्या कमी असल्याचे ते म्हणाले. शहरात मोठ्या संख्येने पट्टे वाटप करण्यात येणार असल्याने आयुक्तांकडे यासाठी वेगळा सेल उघडण्याची विनंती करण्यात आली आहे. आता नव्या 2011 पर्यंतचे अतिक्रमण नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या शासनादेशामुळे पट्टेधारकांच्या संख्येत आणखी वाढ होईल. पट्ट्यासाठी नागरिकांना मतदान कार्ड, इलेक्‍ट्रिक बिल, आधार कार्ड, टॅक्‍स भरल्याची पावती एवढ्या कागदपत्रांची गरज असल्याचेही ते म्हणाले. मालकी पट्ट्यामुळे या नागरिकांना घरबांधकामसाठी कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल, तसेच त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.
उद्या पट्टेवाटप
मालकी हक्क पट्टे वितरण समारंभ येत्या रविवारी, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मोक्षधाम घाटाजवळील टिंबर मार्केट परिसरात होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पट्टे वाटप करतील. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.

Web Title: slum dwellers news