सव्वा लाख ‘एलईडी’चा उजेड पडलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नागपूर  - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीतील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, चार वर्षांपासून महापालिकेला शहरातील रस्त्यांवरील सोडियमचे पथदिवे बदलून एलईडीचा उजेड पाडण्यात यश आले नाही. कंत्राटदाराचे नखरे, आर्थिक चणचणीमुळे सव्वालाख एलईडी दिव्यांपैकी केवळ ३० हजार एलईडीपर्यंतच मजल मारणे शक्‍य झाल्याने स्मार्ट सिटीतील कामाच्या वेगाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 

नागपूर  - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीतील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, चार वर्षांपासून महापालिकेला शहरातील रस्त्यांवरील सोडियमचे पथदिवे बदलून एलईडीचा उजेड पाडण्यात यश आले नाही. कंत्राटदाराचे नखरे, आर्थिक चणचणीमुळे सव्वालाख एलईडी दिव्यांपैकी केवळ ३० हजार एलईडीपर्यंतच मजल मारणे शक्‍य झाल्याने स्मार्ट सिटीतील कामाच्या वेगाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती व वीजबिलावर महापालिकेला कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करणे तसेच ऊर्जा बचतीच्या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय २०१४ महापालिकेने घेतला. या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सध्याचे सोडियम दिवे बदलून एलईडी लावण्याचे कंत्राट जे. के. सोल्युशन इंक कंपनीला दिले होते. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यांत २७ हजारांचे लक्ष्य होते. मात्र, जेमतेम ५३७ पथदिवे बदलून एलईडी लावण्यात आल्याने पहिल्याच टप्प्यात ही योजना रखडण्याचे संकेत मिळाले  होते. त्यामुळे जे. के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यामुळे एलईडीचे  स्वप्न पूर्ण होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. मात्र, मागील वर्षी जानेवारीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नव्याने सुरुवात करण्यात आली.

ऑगस्ट २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३० हजार एलईडी दिवे लावण्यात आले. आता पाच महिन्यांत १ लाख एलईडी बदलण्याचे आव्हान आहे. झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आल्यानंतरही कामे संथगतीने सुरू आहेत. एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष विक्‍की कुकरेजा यांनी केला. मात्र, १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची व्यवस्थाच न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीसोबत पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्तीही लयाला गेल्याचे चित्र आहे. याशिवाय शहरातील मेट्रो रेल्वे मार्गावरील विद्युत खांब काढण्यात आले. मात्र, शहरातील इतर भागातील वाकलेले खांब अद्याप कायम आहे. नवीन खांब उभे करणे, केबल टाकणे, फीडर लावण्याची कामेही रखडली आहेत.

३५० कोटींच्या प्रकल्पाला सुरुंग 
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होणार आहे. याशिवाय ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. मात्र, त्यादृष्टीने अधिकारी व पदाधिकारीही अपयशी ठरल्याने या प्रकल्पालाच सुरुंग लागल्याचे अधोरेखित झाले.

कासवगतीची परंपरा कायम
चार वर्षात १ लाख २५ हजार एलईडी लावण्यात येणार होते. मात्र, आता शक्‍यता धूसर झाली. शहरात लावण्यासाठी जे एलईडी प्राप्त झाले. त्यातून केवळ ३० हजार एलईडी लावल्याने महापालिकेत कासवगतीची परंपरा कायम असल्याचे अधोरेखित होते.

एलईडी लाईट लावण्याची मुदत जुलै-ऑगस्टपर्यंत आहे. मधल्या काळात महापालिकेची आर्थिक स्थिती बरी नसल्याने एलईडी लाइटसाठी एस्क्रो खाते उघडणे शक्‍य झाले नाही. मात्र, आता एस्क्रो खाते उघडून ७.२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. 
- अश्‍विन मुद्‌गल, आयुक्त, महापालिका

Web Title: smart city scheme led light