esakal | अंडे उबवून कृत्रिमरीत्या अजगराच्या चार पिल्लांचा झाला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

अंडे उबवून कृत्रिमरीत्या अजगराच्या चार पिल्लांचा जन्म

अंडे उबवून कृत्रिमरीत्या अजगराच्या चार पिल्लांचा जन्म

sakal_logo
By
विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : कृत्रिमरीत्या अजगराच्या चार पिल्लांचा जन्म झाल्याची घटना मूल वनपरिक्षेत्रात पहिल्यांदाच घडली आहे. पृथ्वीतलावर पाऊल ठेवणाऱ्या चार निरागस पिल्लांना प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५२२ मधील एका नाल्याच्या शेजारी सुरक्षित ठेवण्यात आले आहे. वनविभाग आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य पिलांवर लक्ष ठेवून आहेत. कृत्रिमरीत्या जन्म झालेल्या या अजगरांच्या पिल्लांबाबत वनविभाग आणि संजीवन संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Snake-News-Eggs-hatch-and-Snake-are-born-Chandrapur-District-News-nad86)

चंद्रपूर वनविभागाअंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र मूलमधील अंतरगाव-पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतशिवारात एक अजगर अंड्यासोबत असल्याची माहिती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे व सदस्यांना ३० मे रोजी देण्यात आली होती. त्यांनी याची माहिती क्षेत्र साहाय्यक पी. डी. खणके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना दिली. लगेच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेची चमू चौखुंडे यांच्या शेतशिवारात पोहोचली.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

पाहणी केली असता शेतातील पाळीजवळच्या खड्यात अजगर व अंडे असल्याचे निदर्शनात आले. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी शेतमालक चौखुंडे यांना अजगराला अंड्यातून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली. परंतु, भीतीपोटी शेतमालकाने अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. अजगराला शेतातून घेऊन जाण्याची विनंती केली.

याची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, साहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात अजगर व अंड्याला क्षेत्र साहाय्यक पी. डी. खणके, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना देण्यात आले. अजगराला कक्ष क्रमांक ७५१ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

अजगराच्या अंड्यांना वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना अंड्यांची काळजी घेतल्यानंतर पंधरा ते सोळा अंड्यांपैकी चार अंड्यांतून २० जुलैला पिल्ले निघाली. या घटनेमुळे वनकर्मचारी आणि संजीवन संस्थेच्या सदस्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृत्रिमरीत्या अजगराचे अंडे उबवून पिल्ले निघण्याची ही मूल तालुक्यातील पहिलीच घटना आहे. अजगराच्या चारही पिल्लांना एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ५२२ येथील नाल्या शेजारी सुरक्षितपणे सोडण्यात आले.

(Snake-News-Eggs-hatch-and-Snake-are-born-Chandrapur-District-News-nad86)

loading image