उत्पादकतेसोबतच सोयाबीनची गुणवत्ताही वाढवायची असेल तर करा हे...

soyabean 2.jpg
soyabean 2.jpg

अकोला : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे परंतु, उत्पादकता व गुणवत्ता मात्र घटत आहे. या स्थितीला नैसर्गिक, अनैसर्गिक संकटे निश्चितच कारणीभूत आहेत. परंतु, पेरणीची वेळ, पद्धत, वाणाची निवड करून पुढील प्रमाणे व्यवस्थापन केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविता येईल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

योग्य जमिनीची निवड
मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, सामू 6.5 ते 7.5 पर्यंतची जमीन निवडावी.

सेंद्रिय खताचा वापर (भरखते)
हेक्टरी पाच टन चांगले मुरलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.
 

मुलस्थानी मृद व जलसंधारण
अनियमीत व खंडीत पावसावर उपाय म्हणून उताराला आडवी मशागत व कंडूर पद्धतीने पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी बीबीएफच्या माध्यमातून करावे.
 

आंतरपीक पद्धतीचा अवलंब
मध्यम भारी जमिनीत तूर + सोयाबीन (१:२ ओळ) किंवा कपाशी + सोयाबीन (1:1/1:2 ओळ), कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन + ज्वारी + तूर (6:2:1/ 9:2:1ओळ) किंवा बीबीएफच्या माध्यमातून चार तास सोयाबीन + एक तास तूर या पद्धतीचा वापर करावा.
 

वाणीची निवड
शिफारसीत अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणाची निवड करावी. बियाणे दर्जेदार (निरोगी व जोमदार) असावे. सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन देणारे वाण : एनआरसी-37, जेएस-93-05, एमएयुएस-71, एमएयुएस-158, केडीएस-345 (फुले अग्रणी), डिएस-228, जेएस-97-52, जेएस-20-29 किंवा पीडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस-1001) या पैकी कुठल्याही वाणाची निवड करावी.

बिजपर्क्रिया
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्याला कार्बोक्सीन 37.5 टक्के अधिक 37.5 टक्के (मिश्रघटक) 3 ग्रॅम व 5 ग्रॅम ट्रायकोडरमाची प्रक्रिया करावी. या प्रक्रियेनंतर रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 2 ते 3 तास अगोदर लावावे.

पेरणीची वेळ व पद्धत
जूनच्या तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. बियाणे 4 सें.मी. पेक्षा खोल पेरू नये. पेरणीचे अंतर 30×8/ 45×5 सें.मी. ठेवावे. उताराला आडवी पेरणी करावी. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे पिकांचे हंगामपूर्व नियोजनाप्रमाणे स्वच्छ करून घरीच बियाण्याची उगवण तपासणी करून 70 टक्क्याच्यावर उगवण क्षमता असल्यास एकरी 30 किलो बियाणे वापरावे. उगवण कमी असल्यास एकरी त्याप्रमाणात बियाण्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतोवर बीबीएफच्या पद्धतीचा वापर करावा किंवा 4 ते 5 ओळी नंतर एक ओळ रिकामी सोडावी व पीक फुलावर येण्याआधी रिकाम्या तासातून चर करावा. टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यास उत्पादन अधिक येते, बियाणे कमी लागते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

झाडांची योग्य संख्या राखणे
हेक्टरी 4 ते 4.5 लाख एवढी झाडांची संख्या राखावी, यासाठी उगवणशक्ती तपासून बियाण्याचे प्रमाण ठरवावे. 70 ते 75 टक्के उगवणशक्ती असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणे म्हणजे एकरी 30 किलो बियाणे वापरावे.

पुढील व्यवस्थापण
वरील प्रमाणे प्रक्रिया व व्यवस्थापनानंतर रासायनिक खतांचा संतुलित पुरवठा, आंतरमशागत/ तणव्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन व ओलित व्यवस्थापन करणे महत्वाचा भाग ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com