ना बँड, ना शोभायात्रा, अत्यंत साधेपणाने दुर्गामातेचे आगमन; यंदा मंडळांचा सामाजिक उपक्रमावर भर

चेतन देशमुख
Sunday, 18 October 2020

यवतमाळ शहरातील अनेक मंडळांची दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करताना निघणारी शोभायात्रा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. यंदा मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे बंधने आलेली आहेत. त्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम व शोभायात्रा यंदा काढता येणार नाही. परिणामी, बँड, पारंपरिक वाद्य, झाकी, देखाव्यांविनाच दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली.

यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. तरीदेखील नागरिकांमधील उत्साह कमी झालेला दिसत नाही. शासकीय नियम व आवश्‍यक खबरदारी घेत भक्तीमय वातावरणात दुर्गामातेचे शनिवारी (ता.17) शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. विविध मंडळांचे देखावे यंदा नसले तरी सामाजिक उपक्रमांनी यंदाचा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

कोलकाता व गुजरातनंतर यवतमाळच्या दुर्गोत्सवाचा देशात क्रमांक लागतो, असे सांगितले जाते. ज्या हर्षोल्हासात नवरात्रीचे नऊ दिवस कोलकाता व गुजरातमध्ये साजरे केले जातात, तेच पावित्र्य अन्‌ मांगल्य यवतमाळातही असते. यंदाही अशाच हर्षोल्हासात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे यंदा देखावे कमी झाले आहे. तरीही भाविकांचा उत्साह कायम आहे. दरवर्षी स्थापना शोभायात्रा मोठ्या थाटात असते. अनेक मंडळे पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात दुर्गा मातेची स्थापना करतात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांवर बरीच बंधने आली आहेत. त्यामुळेच यंदा गरबा, दांडिया अशा कार्यक्रमांना परवानगी नाही.

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

मंडळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय नियम, उत्साह व साधेपणाने यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. आजपासून पुढील नऊ दिवस अत्यंत उत्साहात सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प अनेक मंडळांनी केला आहे. परिणामी, यंदा शहरात अन्नदान, दूध वाटप, जगराता असे कार्यक्रम दिसणार नसले तरी रक्तदान, घरपोच अन्नधान्य वाटप, टिफीन सेवा आदी सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी यवतमाळचे ग्रामदैवत असलेले हिंदूस्थानी मंडळ व इतर मंडळांनी अंबाआईचे स्वागत जोरात केले आहे. समर्थ दुर्गादेवी उत्सव मंडळ, स्टेट बँक चौक, नवशक्ती दुर्गा देवी उत्सव मंडळ, गणपती मंदिर, नेहरू चौक, चांदणी चौक, नारिंगेनगर, छोटी गुजरी, माळीपुरा, बंगाली दुर्गादेवी उत्सव मंडळ या ठिकाणी आकर्षक देखावे नसले तरी अत्यंत साधेपणाने दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. 

हेही वाचा - साहेब माझे पैसे वाचवा हो! वृद्धाने फोडला टाहो; तोतयाने...

यंदा शोभायात्रविना प्रतिष्ठापना -
यवतमाळ शहरातील अनेक मंडळांची दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करताना निघणारी शोभायात्रा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. यंदा मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे बंधने आलेली आहेत. त्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम व शोभायात्रा यंदा काढता येणार नाही. परिणामी, बँड, पारंपरिक वाद्य, झाकी, देखाव्यांविनाच दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली.

गर्दीने फुलली बाजारपेठ -
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या मार्च महिन्यापासून बाजारपेठ ओस पडली होती. अनलॉक सुरू झाल्यानंतरही बाजारपेठेत वर्दळ दिसत नव्हती. नवरात्रोत्सव सुरू होताच बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. शनिवारी (ता.17) यवतमाळ शहरातील दत्त चौक, मुख्य बाजारपेठ या भागांसह शहरात इतरही रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जवळपास सात महिन्यांतर वर्दळ दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social program in navratra celebration at yavatmal