साहेब माझे पैसे वाचवा हो! वृद्धाने फोडला टाहो; तोतयाने केली फसवणूक

संतोष ताकपिरे 
Sunday, 18 October 2020

शनिवारी (ता. १७) अचानक सकाळी दहा ते अकराच्या सुमारास अब्दुल हबीब यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक असल्याची बतावणी केली.

अमरावती : तोतयाने बॅंक व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त केली. त्यानंतर वृद्धाच्या खात्यातून टप्प्याटप्याने तीन लाख रुपये लुबाडले. ज्या व्यक्तीचे पैसे गेले ते सायबर पोलिस ठाण्यात रडत रडत पोहोचले. साहेब माझे पैसे वाचवा हो... एवढीच त्यांची मागणी होती.

अब्दुल हबीब अब्दुल नबी (वय ६०, रा. चपराशीपुरा) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी ते शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या बॅंकखात्यात बऱ्यापैकी रक्कम होती. शनिवारी (ता. १७) अचानक सकाळी दहा ते अकराच्या सुमारास अब्दुल हबीब यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक असल्याची बतावणी केली.

रात्रभर चालणार पिंजऱ्याचा खेळ; १० जणांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची नवी आयडिया
 

विश्‍वास संपादन करून अब्दुल हबीब यांना त्यांचा एक धनादेश क्‍लिअरन्सकरिता लागला असून, त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक तोतया अधिकाऱ्याने मागितला. बॅंक अधिकारी असल्याचे समजून अब्दुल हबीब यांनी तोतयास त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर शेअर केला. 

घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्या
 

पहिल्या टप्प्यात तोतयाने पन्नास हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळते केले. त्यानंतर काही मिनिटांतच पाच ते सात वेळा टप्प्याटप्याने दिलेला ओटीपी क्रमांक चुकीचा असल्याचे सांगून नवीन ओटीपी सांगा, अशी त्यांना बतावणी केली. अब्दुल हबीब यांनी त्यांच्या मोबाईलवर टप्प्याटप्याने येत गेलेला ओटीपी त्यांनी तोतया बॅंक अधिकाऱ्यासोबत शेअर केला. त्याआधारे अनोळखी व्यक्तीने त्यांच्या बॅंकखात्यातून तीन लाख दोन हजारांची रक्कम काही मिनिटांतच उडविली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच अब्दुल हबीब यांनी शहर सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

मोबाईलवर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये. त्यातून फसवणुकीची शक्‍यता जास्त असते. तंत्रज्ञानाचा वापर करून असे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे बॅंकखातेदारांनी सतर्क राहावे.
- रवींद्र सहारे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save my money sir! The old man cried in the police station