दुर्दैवच! पतीच्या निधनाचे दु:ख पत्नीला झाले नाही सहन; म्हणूनच...

मनीषा काशिवार
Sunday, 6 September 2020

दांपत्याच्या मृत्युमुळे त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आदित्य आणि तीन वर्षांची जागृती ही मुले अनाथ झाली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. अशावेळी या लहान मुलांचे संगोपन, शिक्षण आणि भावी आयुष्य सुरक्षित व्हावे यासाठी कोहळी समाज बांधव व इतर समाजातील लोकांनी आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला.

साकोली (जि. भंडारा) : असे अघटित घडले की त्याची कल्पनाही करू शकत नाही. एकाच दिवशी होत्याचे नव्हते झाले. वडील गेले आणि त्यांच्यापाठोपाठ आई गेली. अचानक झालेल्या या दुःखद घटनेने समाजमन हेलावून गेले. दोन्ही भावंड अनाथ झाले. मात्र, कोहळी समाजबांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. तीन लाखांचा निधी समाजबांधवांनी जमा केला. हा आदर्श अनेक समाजाने घ्यावा, असा आहे.

वडद येथे आई-वडिलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने अबोध आदित्य आणि जागृती हे बहीण-भाऊ अनाथ झाले. या दोन मुलांच्या मदतीसाठी समाजबांधवांनी मदत गोळा केली. काही दिवसांपूर्वी वडद येथील घनश्‍याम कापगते (वय ३६) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्याचे दु:ख सहन न झाल्याने त्यांची पत्नी देवांगना (वय ३०) हिचाही पती पाठोपाठ मृत्यू झाला.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

दोघांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दांपत्याच्या मृत्युमुळे त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आदित्य आणि तीन वर्षांची जागृती ही मुले अनाथ झाली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. अशावेळी या लहान मुलांचे संगोपन, शिक्षण आणि भावी आयुष्य सुरक्षित व्हावे यासाठी कोहळी समाज बांधव व इतर समाजातील लोकांनी आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला.

यातून गोळा झालेल्या थोड्या थोड्या रकमेतून तब्बल तीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी दामदुप्पट योजनेमध्ये जिल्हा सहकारी बॅंकेत गुंतवला आहे. याबाबत बचत निधीचे प्रमाणपत्र मदतनिधी जमा करण्याच्या कार्यात पुढाकार घेणारे कोहळी समाज कर्मचारी संघटना जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, राजेश कापगते, दिलीप लोदी, बॅंकेचे व्यवस्थापक लंजे, तेजराम डोंगरवार यांच्या उपस्थितीत त्या मुलांना व त्यांचे काका यांना देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

मुलांना थोडा फार हातभार

या निधीमुळे अनाथ मुलांना थोडा फार हातभार लागणार आहे. या कार्यात किशोर डोंगरवार, दिलीप लोदी, अशोक खुने, नंदू गहाणे, होमराज कापगते, ओमप्रकाश संग्रामे, मार्तण्ड कापगते, राजेश कापगते, एकनाथ गहाणे, रमेश संग्रामे, राम कापगते, प्रा. यशवंत लंजे, देवराव कापगते, संजय समरित, अशोक मस्के, दीपक नाकाडे, वाय. एस. मुंगुलमारे कोहळी समाज विकास मंडळ व समाजबांधवांचे सहकार्य मिळाले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The society rushed to the aid of the siblings who lost the umbrella of their parents