नागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस

नागपूर : तयार केलेल्या सौर ई-रिक्षासह दिलीप चित्रे आणि नंदनवार.
नागपूर : तयार केलेल्या सौर ई-रिक्षासह दिलीप चित्रे आणि नंदनवार.

नागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या माध्यमातून रिक्षा चालविण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता नागपूरच्या रस्त्यावरून सौरऊर्जेवरील बस चालविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असून, लवकरच ही बस रस्त्यावर धावेल, असा दावा ते करतात.
वाढत्या आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत आहे. यामुळे भविष्यात भीषण वीजसमस्येचा सामना करावा लागणार आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेला पाऊस आणि अपुऱ्या कोळशामुळे आजही ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन असते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे तास दहा ते बारांवर पोहोचते. हीच बाब चित्रे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्यांनी आपल्या प्रयोगशील बुद्धीला चालना दिली आणि सौरऊर्जेच्या वापरातून एक दोन नव्हे, तर संपूर्ण घरातील वीज उपकरणे चालवून दाखविली. अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसादही दिला.
ग्रामीण भागात उपयुक्‍त ठरेल, अशी कमी खर्चातील सोलर सिस्टिम त्यांनी तयार केली. नागपुरातील खामला मार्गावरील गुरुदेव हीरो मोटर्समधील 140 लाइट्‌स केवळ दीड किलो वॅटमध्ये लावले आहेत. सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ असे बारा तास हे लाइट्‌स सुरू असतात. यासाठी लागलेला एक ते दीड लाखांचा खर्च एका वर्षातच वीज बजतीमुळे निघाला, असे या शोरूमचे मालक सांगतात. नरेंद्रनगरमधील 3 बीएचके फ्लॅट्‌सचे सर्व लाइट्‌स व सीलिंग फॅन केवळ एक हजार वॅटमध्ये चालत आहेत. ज्याचा विजेशी काहीही संबंध नाही. मौदा-रामटेक मार्गावर मांगली गावी इलेक्‍ट्रो लाइनचा बराच त्रास आहे. तेथे श्री राजहंस साठवणे यांच्याकडे 1200 वॅटचे युनिट लावले आहे. घरातील फ्रीजसह सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालत असल्याचे चित्र यांनी सांगितले.
या प्रणातील इनव्हर्टरचा वापर होत नाही. कमी पॅनेलमध्ये जास्त ऊर्जा निर्माण होते. टीव्ही, सेट टॉप बॉक्‍स, पंखे, मोबाईल चार्जिंग, कॉम्प्युटर आदी चालू शकतात. चित्रे यांनी स्थानिक रिक्षावर सोलर पॅनल बसवून चार महिने चाचणी घेतली. ज्यात त्यांना यश आले. ही रिक्षा एका दिवसांत सोलर एनर्जीवर 50 ते 70 किमीचा बॅकअप मिळविते. सध्या सोलर कार तयार करण्याचा त्यांचा विचार असून, त्यांनी त्यासाठी कारही खरेदी केली. यावर प्रयोग सुरू केले. या अनुभवाच्या आधारावर सोलर बस सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
सौरऊर्जेवरील वाहनांना वाव मिळावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इलेक्‍ट्रिक वाहन रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यासोबत इंधनाची बचत होईल. परंतु, यापेक्षा सौरऊर्जेवरील वाहनांना वाव मिळाला, तर निसर्गातून ऊर्जेची निर्मिती होईल. सध्या ही काळाची गरज असल्याचे चित्रे सांगतात.

सौरऊर्जेत प्रचंड ताकद आहे. आगामी काळात या ऊर्जेचा वापर करणे अपरिहार्य होणार आहे. त्यामुळे आताच त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. सध्या मुंबईत बेस्ट बस बॅटरीवर चालते. जर सरकारने संधी दिली तर मी आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून ही बॅटरी बस सौरऊर्जेवर चालवू शकतो. असे झाल्यास नागपुरात पहिली सोलर बस रस्त्यांवरून धावेल ती मी तयार केलेली असेल.
- दिलीप चित्रे, ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com