सोलर पॅनेलने झगमगणार मध्य प्रदेश - अनुपकुमार सत्पथी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - दक्षिण भारतातील क्रिष्णापटनम पोर्टमधून ४५ कंटेनर ‘सोलर पॅनल’ नागपुरात शनिवारी मध्यरात्री दाखल झाले. हा चीनमधील आयात मध्य प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या सौरप्रकल्पासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कंटेनर कॉर्पोरेशनच्या नागपूर इनलॅंड डेपोचे महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य प्रदेशातील रिवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ७४० मेगावॉट प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. यासाठी महिंद्रा एनर्जी, अग्नी आणि स्प्रिंग सोलर, चेन्नई या तीन कंपन्यांनी हा माल बुक केला. प्रथमच क्रिष्णापटणम्‌ पोर्टमधून माल नागपुरात आणण्यात आला. नागपूर कंटेनर डेपोच्या माध्यमातून ही मालवाहतूक केली जात आहे. या पोर्टचा बहुतांश व्यवहार पूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून होत होता. सर्व अंगाने रेल्वेद्वारे कंटेनरची वाहतूक फायदेशीर आहे, हे लक्षात आल्याने वर्षभरापासून प्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण होताच पहिल्यांदा सात लाख रुपये किमतीचे सोलर पॅनल एका कंटेनरमध्ये आहे. अशा ४५ कंटेनरची पहिली ही खेप नागपुरात आली. यानंतर दोन रेक प्रस्तावित आहेत. यावेळी कॅप्टन विजय शेखर, भारतीय कंटेनर कॉर्पोरेशनच्या नागपूर इनलॅंड डेपोच्या कस्टमप्रमुख डॉ. पिंकी बास्के, डेपोप्रमुख राजीव भोवल, व्यवस्थापक अरविंद कुमार, शशी चौधरी उपस्थित होते.

मालवाहतूक होणार सुलभ
मध्य प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी एकूण पाच हजार कंटेनरच्या माध्यमातून सोलर पॅनल पाठविण्यात येणार आहे. नागपूर कंटेनर डेपोशी कृष्णानपटनम पोर्ट जुळल्याने बांग्लादेश, श्रीलंका, मलेशिया, थायलंड आदी देशाशी मालवाहतूक नागपूर मार्गे सुलभ होईल, असा विश्वासही सत्पथी यांनी व्यक्त केला.

Web Title: solar panel madhyapradesh