esakal | दारव्हा शहरात केली अधिकारी, पोलिसांवर दगडफेक... हे आहे कारण 
sakal

बोलून बातमी शोधा

Darwha cit

मृतदेह ताब्यात देण्यावरून अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्याचबरोबर प्रभागात सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशी तक्रार करीत शिवीगाळ करण्यात आली आणि अचानक दगडफेक सुरू झाली.

दारव्हा शहरात केली अधिकारी, पोलिसांवर दगडफेक... हे आहे कारण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी व या भागातील असुविधांबाबतच्या तक्रारीवरून गैरकायद्याची मंडळी जमवून अधिकारी व पोलिसांशी वाद घालत दगडफेक करण्यात आली. ही घटना रविवारी (ता.14) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील एक महिला कोरोनाबाधित निघाल्याने या भागात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. शनिवारी (ता.13) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृताचे नमुने घेण्यासाठी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्याकरिता वैद्यकीय पथक गेले होते. त्यावेळी मृतदेह नेण्यास विरोध करण्यात आला. शेवटी अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालून कब्रस्तानमधून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर याच प्रभागात प्रतिबंधित क्षेत्रातील काही नागरिक गोळा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून तहसीलदार संजय जाधव, ठाणेदार मनोज केदारे, मुख्याधिकारी धीरज गोहाड तेथे पोहोचले. तेव्हा सय्यद फारुख यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांची गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना त्या ठिकाणी घेऊन आले.

अवश्य वाचा-  सुंदर तरुणींना पुढे करून `लुटेरी दुल्हन` प्रिती दास युवकांना ओढायची जाळ्यात

मृतदेह ताब्यात देण्यावरून अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्याचबरोबर प्रभागात सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशी तक्रार करीत शिवीगाळ करण्यात आली आणि अचानक दगडफेक सुरू झाली. यामध्ये शासकीय वाहनांचे नुकसान झाले. शिवाय तहसीलदाराच्या वाहनाच्या चालकाच्या डोक्‍याला दुखापत झाली, अशी फिर्याद तहसीलदारांनी पोलिसात दिली. तहसीलदार तथा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी सय्यद फारुख यांच्यासह शंभर ते सव्वाशे अनोळखी व्यक्तींविरुद्घ पोलिसात तक्रार दिली. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. या घटनेने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विविध भागांतील बाजारपेठ बंद करण्यात आली. अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली असून, तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

अपर पोलिस अधीक्षकांची भेट 

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत अपर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दारव्हा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. शिवाय घडल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली.