मुलाच्या अखेरच्‍या दर्शनालाही मुकला बाप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - उपचारासाठी बंगळुरूला जात असलेल्या मुलावर काळाने रेल्वेप्रवासादरम्यानच झडप घातली. पुरेसे पैसे नसल्याने मृतदेह गावाला नेणे शक्‍य नव्हते. वडिलांना पोटच्या गोळ्याच्या अंत्यदर्शनासाठीही येता आले नाही. आई आणि दोन भावांच्या उपस्थितीतच मृत मुलावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

नागपूर - उपचारासाठी बंगळुरूला जात असलेल्या मुलावर काळाने रेल्वेप्रवासादरम्यानच झडप घातली. पुरेसे पैसे नसल्याने मृतदेह गावाला नेणे शक्‍य नव्हते. वडिलांना पोटच्या गोळ्याच्या अंत्यदर्शनासाठीही येता आले नाही. आई आणि दोन भावांच्या उपस्थितीतच मृत मुलावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

क्रिष्णा प्रभू शर्मा (११) रा. गाजीपूर (उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून तो आजारी होता. गरिबीमुळे गावी उपचार करणेही शक्‍य नव्हते. यामुळे आईवडील व्यथित होते. क्रिष्णाचा मोठा भाऊ बंगळुरूमध्ये वास्तव्यास आहे. तिथे क्रिष्णाला आणून उपचार करण्याचा निर्णय शर्मा कुटुंबीयांनी घेतला. आई क्रिष्णा आणि अन्य एका मुलाला सोबत घेऊन संघमित्रा एक्‍स्प्रेसने बंगळुरूला जाण्यासाठी निघाले. नागपूरला पोहोचण्यापूर्वीच क्रिष्णाची  हालचाल पूर्णपणे थांबली. गाडी नागपूर स्थानकावर थांबताच रेल्वेच्या डॉक्‍टरांनी क्रिष्णाला तपासून मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी फलाट गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवून दिला. 

पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईचे अवसानच गळाले. तिने स्वत:ला कसेबसे सावरत पती प्रभू यांना तसेच बंगळुरूला राहणाऱ्या मुलाला घटनेची माहिती दिली. पैसे नसल्याने प्रभू यांनाही मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी येता आले नाही. काळजावर दगड ठेवत त्यांनी नागपुरातच अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली. मोठा भाऊ नागपुरात दाखल झाल्यानंतर शनिवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले. 

हॉटेलमालकाची सहृदयता
क्रिष्णाचा मोठा भाऊ बंगळुरूला हॉटेलमध्ये वेटर म्हणून कार्यरत आहे. लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच त्याचेही अवसान गळाले. भावाच्या अंत्यदर्शनाला जाण्याची इच्छा त्याने  मालकाकडे व्यक्त केली. सहृदयी मालकाने तातडीने त्याला पैसे देत नागपूरला जाण्याची सूचना केली. रेल्वेने पोहोचायला वेळ लागत असल्याने मालकाने विमानाचे तिकीट काढून देत  विमानातून रवाना केले.

Web Title: son funeral krishna sharma money problem