काय सांगता! जिल्हा प्रशासनातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात, वर्धेकरांत भीतीचे वातावरण

रूपेश खैरी
Saturday, 11 July 2020

लग्नात असलेल्या वऱ्हाड्यांचा शोध घेत हाती आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित नवरदेवाची नवरी आणि त्याची आई कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. या दोघींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असताना दुपारी लग्नात गेलेल्या दोघांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी पाच रुग्ण निघाले होते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना म्हणून वर्धेत सोमवारपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. 

जिल्हा प्रशासनातील अधिकारी काही कामानिमित्त मूळगावी धुळे येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेत आपला स्त्राव तपासणीसाठी दिला होता. त्याचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला. जिल्हा प्रशासनातील अधिकारी नालवाडी परिसरातील पाटीलनगर परिसरात वास्तव्यास असल्याचे प्रशासनाने सांगितले.

क्लिक करा - 10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत पिपरी (मेघे) येथील झालेल्या लग्नाने प्रशासनाची झोप उडविली आहे. आता खुद्द जिल्हा प्रशासनातील अधिकारी कोरोनाबाधित निघाल्याने आणखीच चिंता वाढली आहे. पिपरीच्या लग्नातील वऱ्हाडी शोधण्याचे काम सुरू आहे. पिपरी येथील प्रकरणात आलेल्या अहवालात नवरदेवाची आई, नवरी आणि लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी इतवारा परिसरातील दोन वऱ्हाडी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला आता धडकी भरली आहे. 

लग्नात असलेल्या वऱ्हाड्यांचा शोध घेत हाती आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित नवरदेवाची नवरी आणि त्याची आई कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. या दोघींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असताना दुपारी लग्नात गेलेल्या दोघांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. हे दोघे इतवारा बाजार परिसरातील रहिवासी आहेत. हा भाग दाटीवाटीचा असल्याने परिसरात त्यांचा आणखी कोणाशी संपर्क आला याचा शोध घेण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

आतापर्यंत तीस जणांचे घेतले स्राव

लग्न समारंभात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण तीस जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे येत्या दिवसात आणखी किती जणांचा स्वॅब पॉझिटिव्ह येईल हे सांगणे सध्या कठीण आहे. यामुळे वर्धेकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District administration officer corona positive at Wardha