सोनिया गांधी म्हणाल्या गडकरींना "थॅंक यू' !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सोनिया गांधी म्हणाल्या गडकरींना "थॅंक यू' !
नागपूर : पक्षीय राजकारणाच्या पलीकडे मतदारसंघाचे हित अधिक महत्त्वाचे असते. याची प्रचिती देणारी एक घटना अलीकडेच देशाच्या राजकारणात घडली आणि त्याची चर्चा सर्वदूर होऊ लागली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेले आभाराचे पत्र या चर्चेला कारणीभूत ठरत आहे.

सोनियांनी कोणत्या कारणाने गडकरींना "थॅंक यू' म्हटले, याची विशेष चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. नितीन गडकरी यांनी सोनिया गांधींच्या मतदारसंघातील कामांना गती दिल्याबद्दल हे आभाराचे पत्र आहे. मुळात केंद्रीय मंत्र्याने एखाद्या मतदारसंघात विकासकामांना गती देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण, तरीही सोनियांनी आभार का मानले असावे, हा प्रश्‍न कायम राहतो. त्याचे मुख्य कारण इतर केंद्रीय मंत्र्यांच्या "स्लो रिस्पॉन्स'मध्ये दडले आहे. गडकरींनी ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला, तसा सरकारमधील इतर मंत्र्यांकडून सहसा मिळत नाही, असे सोनिया गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनीच एका राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. रायबरेली क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या विकासकामांना गती देण्याकरिता सोनिया गांधी संबंधित मंत्रालयांना सातत्याने पत्रे पाठवत असतात.
फैजाबाद जिल्ह्यात "330ए' या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाशी संबंधित एक पत्र सोनियांनी नितीन गडकरी यांना लिहिले होते. आपल्या मतदारसंघातील 47 किलोमीटरच्या रस्त्याचेही चौपदरीकरण केले, तर फैजाबाद-अयोध्या असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल, असे सोनियांनी सूचविले होते. रायबरेलीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 232 व 232 ए यांचेदेखील चौपदरीकरण करण्याचा विचार करावा, असेही यात नमूद होते. नितीन गडकरींनी 20 जुलैला सोनिया गांधी यांना पत्र लिहून या कामांना मंजुरी मिळाल्याचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे कळविले. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्टला एक पत्र लिहून गडकरींचे धन्यवाद मानले तसेच येत्या काळात रायबरेलीतील राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुखावणारा सकारात्मक प्रतिसाद
देशात मोदी सरकार आल्यानंतर राहुल गांधी यांचे अमेठी व सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातील कामांची गती मंदावली होती. काही प्रकल्प अर्धवट राहिले तर काहींना दुसऱ्या राज्यांमध्ये हलविण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद सोनियांना सुखावणारा ठरला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: soniya gandhi say nitin gadkari thanku