esakal | सोयाबीनचे दर आणखी खालावण्याची भीती, आता मिळतोय 'इतका' दर
sakal

बोलून बातमी शोधा

soybean

सोयाबीनचे दर आणखी खालावण्याची भीती, आता मिळतोय 'इतका' दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : यंदाच्या खरिपातील सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून नवीन सोयाबीनची बाजारातील आवक वाढली असताना भाव (Soybean Rate) मात्र पडू लागले आहेत. मे महिन्यात दहा हजाराचा टप्पा पार करणाऱ्या सोयाबीनला हंगामात मात्र 4 हजार 200 ते 5 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. हंगामाची जेमतेम सुरुवात झाली असताना ही स्थिती आहे. तर, आवक वाढल्यानंतर काय? या प्रश्नाने ते हैराण झाले आहेत.

हेही वाचा: शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, गुन्हा दाखल

खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यात यावर्षी 2 लाख 62 हजार 884 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे 77 हजार हेक्टर क्षेत्रातील पीक हातचे गेले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले आहे. बऱ्याच भागांत सोयाबीन जळून गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच नुकसान सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर बाजारातील भाव घसरल्याने नुकसानीत आणखीनच भर पडली आहे. खरिपातील नवीन हंगामास प्रारंभ झाला आहे. एप्रिल -मे महिन्यात सोयाबीनने दहा हजाराचा पल्ला पार केला होता. त्यानंतरही भाव स्थिर जरी राहिले नाहीत तरी चढे दर मात्र कायम होते. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला 3,950 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. स्थानिक बाजार समितीत शनिवारी (ता.9) नवीन सोयाबीनची 9 हजार 737 पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. लिलावात सोयाबीनला किमान भाव 4200 रुपये प्रतिक्विंटल व कमाल भाव 5200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. सरलेल्या सप्ताहात नवीन सोयाबीनला याच श्रेणीत भाव मिळाले आहे. आवक वाढल्यानंतर पुन्हा भाव घसरण्याची शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे. एन हंगामात भाव कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे. बाजारातील तेजी कायम राहावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.

भाव स्थिर राहणार नाहीत -

सोयाबीनची आवक वाढेल तसा भाव कमी होत जाईल असा अंदाज आहे. सद्या बऱ्यापैकी भाव मिळत आहे. केंद्राचे आयात धोरण व स्टॉक लिमिट याचा एकंदरीत परिणाम शेतमाल खरेदीवर होणार आहे. त्यामुळेच खरेदीदार माल असला तरी खरेदी करण्यास पुढे येणार नाहीत, असा अंदाज अडते राजेश पाटील यांनी वर्तविला.

loading image
go to top