सोयाबीन खरेदीला नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

भिवापूर - शासनाने जवळपास सर्वच मालाचे हमीभाव जाहीर केले. परंतु, स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात होऊनही मागील वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा शासनातर्फे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे कोणीच व्यापारी सोयाबीनसाठी जाहीर झालेला ३ हजार ३९९ रुपयांचा हमी भाव शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही. पैशाची गरज व इतर अडचणीमुळे शेतकऱ्यांना मालाची साठवणूक करता येत नाही. परिणामी खरेदी सुरू झाल्यापासून खरेदीचे दर क्विंटलमागे २,७०० ते २,८५१ रुपयांच्या आतच फिरत आहेत.

अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन कापणी झाली असल्याने या मालाची बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली. सोयाबीन खरेदीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ११) ३,२०० क्विंटल आवक होती. माल ओलसर असल्याने व्यापाऱ्यांनी २,७०० रुपयांपासून बोलीला सुरुवात करून ती २,८५१ रुपयांपर्यंत थांबविली. ओलसर मालात नंतर घट होत असल्याने हमीभावात खरेदी करणे परवडत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीसाठी किमान महिनाभर वाट पाहावी लागेल, असे दिसते.

शेतकऱ्यांचा माल खरेदीच्या शेवटीशेवटी हमीभावापर्यंत पोहोचतो. परंतु, अनेक गरीब शेतकरी उसणवार करून शेती करीत असल्याने भाववाढीची वाट पाहात थांबणे त्याला शक्‍य होत नाही. अखेर या भाववाढीचा फायदा शेतकऱ्याला मिळण्याऐवजी व्यापाऱ्यांना होतो, अशी स्थिती नेहमीच पाहावयास मिळते.

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू असल्याची बाब बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक श्रेणी-१ (सहकारी संस्था) यांना पत्राद्वारे कळविली आहे. परंतु, त्यात मालाच्या ओलसरपणामुळे व्यापारी हमीभाव देत नसल्याचे कारण स्पष्ट केले आहे. विदर्भातील सर्व बाजार समित्यांमध्ये खरेदी झालेला माल अद्याप हमीभावापर्यंत गेला नसल्याचे समितीचे व्यवस्थापक गोंगल यांनी बाजारभावाची आकडेवारी पाहून सांगितले.

नफ्यात असूनही सोयी-सुविधांचा अभाव
बाजार समितीने मागील वर्षी व्यापाऱ्यांकडून ७६ लाख ३८ हजार २७ रुपये इतका सेस वसूल केला. सर्व खर्च वजा जाता बाजार समिती २२ लाख ६५ हजार ९२६ रुपये इतक्‍या नफ्यात आहे. बाजार समितीला दरवर्षी नफा होत असूनही समितीच्या आवारात अनेक सोयी-सुविधांचा अभाव आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean Purchasing Oppose