शाळांसाठी खुशखबर! आता 'या'साठी मिळणार स्पेशल निधी, एक-दोन दिवसांतच होणार वितरण

श्रीकांत पेशट्टीवार
Monday, 8 February 2021

जिल्ह्यात एक हजार 570 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने भारतात हातपाय पसरविले. प्रारंभी एक-दोन कोरोनाबाधित रुग्ण अनेक ठिकाणी आढळून आले.

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कुलुपबंद असलेल्या शाळा आता उघडल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेक शाळांत कोरोनाचे बाधित रुग्ण वास्तव्यास होते. आता शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेसाठी स्पशेल निधी मंजूर केला आहे. काही ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी मंजूर निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 38 लाख 65 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला.

हेही वाचा - ब्रेकिंग: नागपूरच्या वाडीजवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला...

जिल्ह्यात एक हजार 570 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने भारतात हातपाय पसरविले. प्रारंभी एक-दोन कोरोनाबाधित रुग्ण अनेक ठिकाणी आढळून आले. मात्र, हळूहळू रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून राज्यशासनाने लॉकडाउन जाहीर केले होते. या काळात अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनाने अनेकजण रस्त्यावर आले. कोरोनामुळे जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्षही लांबणीवर पडले. शाळा, कॉन्व्हेंट ऑनलाइन पद्धतीनेच काही महिने सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल, नेटवर्कच्या समस्यांनी तेथे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले नाही. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने नोव्हेंबर महिन्यात नववी ते पाचवीचे वर्ग सुरू केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजना करूनच वर्ग सुरू करण्यात आले. नवीन वर्षात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार हेही वर्ग सुरू करण्यात आले. आता हळूहळू विद्यार्थी संख्याही शाळेत वाढत चालली आहे. 

हेही वाचा - 'बर्ड फ्लू'मुळे बकरे, मासे खाऊ लागले भाव, दर पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कोरोना काळात बाहेरून येणारे, गावांतील कोरोना बाधित रुग्णांची राहण्याची व्यवस्था शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालय, समाजभवनात करण्यात आली. आश्रमशाळा, महाविद्यालये, समाजभवन सॅनिटायझिंग करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या स्वच्छतेचा मुद्दा समोर आला होता. तेव्हा राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी स्पशेल निधी मंजूर केला आहे. या निधीतून शाळांची साफसफाई, पेंटींग, हॅण्डवॉश, सॅनिटायझर यासह अन्य वस्तूंची खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेला हा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांना वितरित करण्यात आला आहे. काही ठिकाणी निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 38 लाख 65 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. 

जिल्हा निधी
चंद्रपूर 1 कोटी 38 लाख 65 हजार
गडचिरोली 77 लाख 20 हजार
भंडारा    63 लाख 13 हजार
गोंदिया 1 कोटी 51 लाख
वर्धा 69 लाख 99 हजार
नागपूर 1 कोटी 25 लाख 

 
शाळांच्या साफसफाईसाठी जिल्ह्याला एक कोटी 38 लाख 65 हजारांचा प्राप्त झाला आहे. एक -दोन दिवसांत हा निधी शाळांना दिला जाणार आहे. 
-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प. चंद्रपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special fund to school for sanitation in chandrapur