दिवाळीपूर्वीच आरोग्य मिशनमागे 'फटाके', विशेष सभा गाजणार

सुधीर भारती
Thursday, 29 October 2020

आरोग्य मिशनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत संशयास्पद खरेदीचा मुद्दा गाजण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच आरोग्य मिशनला फटाके लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये तसेच साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. याच मुद्द्यावर नऊ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य मिशनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत संशयास्पद खरेदीचा मुद्दा गाजण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच आरोग्य मिशनला फटाके लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -  फडणवीसांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपांवर राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांची रंगरंगोटी, डागडुजीवर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ कागदोपत्री कामे झाल्याचा सदस्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे औषध खरेदी, संगणक खरेदीचे व्यवहारसुद्धा संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. याशिवाय मुदतबाह्य औषधांचा साठा, आरोग्यकेंद्रांची दूरवस्था झाली आहे. त्यातच आता आरोग्य मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सदस्य हे मुद्दे उचलून धरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नऊ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विशेष सभेत फटाके फुटणार, हे निश्‍चित मानले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special meeting for review health mission in amravati