Video : फवारणीतून 33 शेतकऱ्यांना विषबाधा; 5 जण अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

सध्या खरीप पिकांवर फवारणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा हाेत असल्याच्या घटना घडत आहेत.

अकाेला : शेतात कीटकनाशक फवारणीतून वेगवेगळ्या गावातील 33 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांच्यावर स्थानिक सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच शेतकरी आयसीयूमध्ये भर्ती आहेत, तर दाेन व्हेंटिलेटरवर आहेत. विषबाधित 33 शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक 26 शेतकरी अकाेला जिल्ह्यातील, तर इतर सात शेतकरी बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे, शनिवारीच (ता. 24) फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे अंदुरा येथील गजानन जाणूजी इंगळे (वय 48) यांचा मृत्यू झाला हाेता. 

सध्या खरीप पिकांवर फवारणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा हाेत असल्याच्या घटना घडत आहेत. पिकांवर कीटनाशकाची फवारणी करताना दक्षता न घेणाऱ्या 33 शेतकऱ्यांवर स्थानिक सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक 26 शेतकरी अकाेला जिल्ह्यातील इतर सात शेतकरी वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.

संबंधित शेतकऱ्यांपैकी रतन सुरवाडे व सुरेश खाेपले या शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर, तर इतर तीन शेतकऱ्यांंवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वच शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. विषबाधित शेतकऱ्यांची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. 

आतापर्यंत फवारणीच्या फासात 133 शेतकरी 
यावर्षी एप्रिलपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 133 शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यापैकी 107 शेतकऱ्यांना उपचारानंतर दवाखान्यातून सुटी झाली आहे. परंतु तीस शेतकऱ्यांवर उपचार सुरूच आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spraying poisoned 33 farmers and 5 people are sick