एसटीने विद्यार्थिनीला चिरडले

File photo
File photo

एसटीने विद्यार्थिनीला चिरडले
नागपूर : भरधाव एसटीने दुचाकीस्वार विद्यार्थिनी खुशी ऊर्फ रागिणी पांडुरंग खोत (12, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) हिला जबर धडक दिली. अपघातात ती ठार झाली तर मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, आरोपी चालक मनीष सखाराम सोनटक्‍के (27, रा. वर्धमाननगर) याला अटक केली.
खुशी ही नंदनवमधील विश्‍वास माध्यमिक शाळेत सातवीची विद्यार्थिनी होती. आई नंदा गृहिणी आहे. वडील पांडुरंग हे मोमिनपुरा येथील हॅण्डलूम कारखान्यात कामाला आहेत. चार बहिणींमध्ये खुशी सर्वांत लहान होती. दिवाळीच्या सुट्यांमुळे शिकवणीवर्ग बंद होते. सोमवारपासून शिकवणी वर्गाला सुरुवात झाली. शाळेतून परतल्यानंतर दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास खुशी मोठी बहीण निकितासोबत दुचाकीवर शिकवणी वर्गाला जाण्यासाठी निघाली. दोघीही गंगाबाई घाट चौकातून महालकडे जात होत्या. मागून भरधाव आलेल्या एमएच-40/एन-8599 क्रमांकाच्या बसने जगनाडे चौकाकडे वळण घेतल्याने निकिताच्या दुचाकीला धडक लागली. दोघीही बहिणी पडल्या. खुशी बसच्या चाकाखाली आली. डोक्‍यावरून चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला.
काही अंतरावरच नागरिकांनी बस थांबविली. निकिताने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तत्काळ खुशीला जवळच्या खासगी रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
जगनाडे चौकात तणाव
अपघात झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. नागरिकांनी बसवर दगडफेक करीत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. बसच्या काचा फोडल्या. मात्र, नंदनवनच्या पीएसआय बावनकर यांनी वेळीच घटनास्थळावर पोहचून अनर्थ टाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com