मालवाहतुकीतून एसटी झाली मालामाल, तब्बल ६८ लाखांची कमाई

ST earn 68 lakh rupees from goods carrying in amravati
ST earn 68 lakh rupees from goods carrying in amravati

अमरावती : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतुकीसोबतच प्रवासी वाहनांमधून आवश्‍यक आणि इतर वस्तू नेण्यास मंजुरी दिली. त्यामुळे मालवाहतुकीच्या माध्यमाने अमरावती विभागाने ६८ लाखांची कमाई केली आहे. 

महामंडळाने २१ मेपासून मालवाहतुकीस सुरुवात केली. मालवाहतुकीचे दर अत्यंत माफक असल्याने याकडे कल वाढत आहे. मालवाहतुकीच्या सेवेचा लाभ शेतकरी, व्यापारी, लघू व मोठे कारखानदार तसेच शासकीय, निमशासकीय खात्यांना देण्यात आला आहे. यातून आजवर महामंडळाने ६८ लाखांची कमाई केली आहे. महामंडळाने आतापर्यंत मालवाहतूक ट्रकद्वारे एकूण एक हजार २७६ फेऱ्या चालविल्या आहेत. यात एकूण एक लाख ९३ हजार २५१ किलोमीटर वाहतूक झाली आहे. यात महामंडळाला ६७ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. मालाची वाहतूक पूर्णत: सुरक्षित आणि वेळेत वितरण केले जात आहे. सुरक्षित व विश्‍वासार्ह वाहतुकीमुळे नागरिकांनी सेवा घेण्यास अनुकूलता दर्शविली आहे. सदरची सेवा ही २४ तास सुरू आहे. 

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. सामान्य प्रवाशाकरिता महामंडळाची वाहतूक काही अपवाद वगळता स्थगित करण्यात आली. एक जूनपासून टप्प्याटप्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने विभागास दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यानंतर २१ ऑगस्टपासून ५० टक्‍के प्रवासी क्षमतेने आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर १८ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानुसार अमरावती विभागातील सर्व आगाराची जिल्हा वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र, प्रवासी प्रतिसाद अत्यल्प असल्यामुळे १० ते १२ लाख उत्पन्न मिळाले. 

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने प्रवासी वाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार दररोज दिवाळीनंतर जवळपास ३३ ते ३४ लाख उत्पन्न झाले आहे. आंतरराज्य वाहतुकीमध्ये हैदराबाद, खंडवा, भोपाळ, बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतूल, मुलताई, पांढुर्णा अशा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरजिल्हा वाहतुकीमध्ये नागपूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी, अंबेजोगाई, माहूर, मांडवी, लातूर, बीड, बुलडाण, चंद्रपूर, नाशिक, जळगाव अशा इतरही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीच्या अमरावती विभागामध्ये सरासरी एक हजार ७६ फेऱ्या चालविल्या जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com