एसटीच्या भाडेवाढीवर तूर्तास फुलस्टॉप?

आशिष ठाकरे
शुक्रवार, 15 जून 2018

बुलडाणा - राज्यात सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी एसटी आर्थिक संकटात आल्यामुळे त्यावरील बोजा कमी करण्यासाठी महामंडळाने विविध सबबीअंतर्गत 14 जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ करण्याचे संकेत दिले होते. परंतु यासंदर्भात विभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत संध्याकाळपर्यंत कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न आल्यामुळे तूर्तास भाडेवाढीवर फुलस्टॉप लागला असल्याची माहिती आहे.

इंधन दरवाढ, सुट्या भागांचा वाढीव खर्च, कर्मचारी वेतनवाढ आदी कारणांमुळे एसटी महामंडळावर जादा भार पडत आहे. हा भार कमी करण्यासाठी महामंडळाने गुरुवार, 14 जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीटदरांमध्ये 18 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारी (ता. 14) मध्यरात्रीपासून होणार असल्याचे म्हटले होते.

भाडेवाढीसंदर्भात मध्यवर्ती कार्यालयातून कोणत्याही प्रकारची सूचना मिळाली नव्हती. भाडेवाढ पुढे ढकलणे किंवा रद्दबाबतही काहीच सूचना नसल्यामुळे याबाबत नेमके सांगता येणार नाही. तथापि, शुक्रवार (ता. 15) किंवा शनिवारी (ता. 16) याबाबत काय निर्देश येतात यावर वाढीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि तशा सूचना देण्यात येतील.
- संदीप रायलवार, विभागीय नियंत्रक, बुलडाणा

Web Title: ST rent issue