एसटी कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत, जगण्याचा प्रश्‍न कायम

चेतन देशमुख
Monday, 28 September 2020

लॉकडाउन काळात टप्प्याटप्प्यात मिळणाऱ्या वेतनामुळे कर्मचारी चिंतित आहेत. अशातच आता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. तीन दिवसांनंतर सप्टेंबर महिनाही पूर्ण होणार आहे. परिणामी तीन महिन्यांच्या वेतनाच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत.

यवतमाळ : कोरोनामुळे अनेकांपुढे मोठे प्रश्‍न उभे केलेले आहेत. छोटे व्यावसायिक व कंत्राटी कामगारांवर संकट कोसळले आहे. अशातच आता निमशासकीय सेवेत येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी ५० टक्के, कधी ७५ टक्के वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले.

आता तर गेल्या दोन महिन्यांपासून वेतनही मिळाले नाही. सप्टेंबर महिन्याचे केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे गेल्या जवळपास सात महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. सुरुवातीला वाहतूक बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना टप्पाटप्प्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र, त्याआधी अनेक अडचणींचा सामना अनेक कर्मचाऱ्यांना करावा लागला.

तीन दिवसांनंतर तीन हिने पूर्ण

लॉकडाउन काळात टप्प्याटप्प्यात मिळणाऱ्या वेतनामुळे कर्मचारी चिंतित आहेत. अशातच आता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. तीन दिवसांनंतर सप्टेंबर महिनाही पूर्ण होणार आहे. परिणामी तीन महिन्यांच्या वेतनाच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. गेल्या ९० दिवसांपासून वेतन नसल्याने अनेकांवर उधारीवर जगण्याची वेळ आली आहे. कर्मचारी व कामगार संघटनांकडून वेतनाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

अवश्य वाचा :  माय बाप सरकार दिव्यांगांची मस्करी करू नका, पगार तर वेळवेवर द्या

एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळासमोरही अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. या काळात शासनाने एसटीला मदत करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. तीन दिवसांनी तीन महिने पूर्ण होणार आहेत. यादरम्यान वेतन न झाल्यास बिकट परिस्थितीचा सामना करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाणून घ्या : ‘नाफेड'च्या कापूस खरेदीसाठी उद्यापासून नोंदणी, शेतकऱ्यांनी घ्यावी दखल

संघटनेकडून पाठपुरावा सुरू
गेल्या दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. तीन दिवसांनी तीन महिने होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. संघटनेकडून पाठपुरावादेखील सुरू केलेला आहे.
-संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, मुंबई.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers have been waiting for their salaries for three months