कुकरेजांचे बजेट भसकले 

कुकरेजांचे बजेट भसकले 

नागपूर - स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २८०१ कोटींचा अर्थसंकल्प  सादर करताना शहर विकासकामे, दुरुस्तीची कामे आदींसाठी मोठी तरतूद केली. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ८.८० टक्के खर्च करण्यात आल्याने कुकरेजा यांचे अर्थसंकल्पातील दावे फोल ठरले आहेत. उत्पन्नातही निराशाजनक कामगिरी असून नऊ महिन्यांचे निर्धारित २१००.७५ कोटींचे उत्पन्न गाठण्यातही प्रशासन अपयशी ठरले. केवळ १७५० कोटी रुपये तिजोरीत आले.

स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपुष्टात येणार आहे. डिसेंबरपर्यंत झालेले महापालिकेचे उत्पन्न व विकासकामांवरील खर्चाचा विचार करता कुकरेजा यांच्यापुढे लक्ष्य गाठण्याचे अतिशय अवघड आव्हान दिसून येत आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात स्थायी समितीने २४६.६ कोटींच्या कामाचे कार्यादेश दिले अर्थात एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ८.८० टक्के खर्च विकासकामांवर झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय १५० कोटींच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. अर्थसंकल्पात कुकरेजा यांनी रस्ते दुरुस्तीसाठी ४०८.३८ कोटींची तरतूद केली होती. मात्र, महापालिकेला केवळ १२ कोटी खर्च करता आले. खड्डे दुरुस्तीसाठी १६ कोटींची तरतूद केली होती, मात्र यावर केवळ ७७.९९ लाख खर्च  करण्यात आले. आरोग्य विभागासाठी २४.५० कोटींच्या तरतुदीच्या तुलनेत नऊ महिन्यात केवळ ५.५२ कोटी खर्च झाले. ५७२, १९०० ले-आउटमध्ये नागरी सुविधांसाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली होती. 

मात्र, २ कोटी २० लाख खर्च करण्यात आले. शहरातील पुलांसाठी १.५० कोटींची तरतूद केली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला २९.९ लाख रुपये खर्च करण्यात यश आले. मैदाने, त्यांची दुरुस्ती तसेच क्रीडा विकास कार्यक्रमासाठी २२ कोटी रुपये कुकरेजा यांनी राखून ठेवले. प्रत्यक्षात १६.७७ लाख रुपयांच्या कामाचेच कार्यादेश डिसेंबरअखेरपर्यंत देण्यात आले. शहर हिरवे करण्यासाठी ९.०५ कोटींची तरतूद आहे. मात्र, उद्यान विभागाला एक रुपयाही मिळाला नसल्याची धक्कादायक बाबही सूत्राने नमूद केली. डिसेंबरपर्यंत २१००.७५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, महापालिकेला १७५० कोटी रुपये वसूल करणे शक्‍य झाले. अर्थसंकल्प घोषित करताना विविध योजनांचा उल्लेख केला जातो. मात्र, ५० टक्केही खर्च केला जात नाही, अशी टीका काँग्रेसचे सदस्य मनोज सांगोळे यांनी केली. आता नवीन सीएसआर दरामुळे अनेक प्रकल्पांची किंमत वाढली, यासाठी कोण जबाबदार आहे? असा सवालही त्यांनी केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सत्ताधाऱ्यांना वचनपूर्ती शक्‍य होत नाही तर आकडे कशाला फुगविले जाते? असा सवाल त्यांनी केला. कुकरेजा यांनी आस्थापनेवर दरमहा ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय अनेकांची जुनी देणी दिली तसेच सिमेंट रस्त्याच्या तिन्ही टप्प्याच्या कामासाठी निधी दिल्याचे ते म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com