गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा; राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलनांच्या 5 माजी अध्यक्षांचे शासनाला आवाहन

मिलिंद उमरे 
Monday, 26 October 2020

या पाचही माजी अध्यक्षांनी सरकारला दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोलीची दारूबंदी तेथील जनतेच्या मागणीमुळे करण्यात आली आहे व ती प्रभावी आहे. ती आदिवासी, स्त्रिया व व्यसनी पुरुष तिघांनाही सुरक्षा देते.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या माजी अध्यक्षांमध्ये राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक/समाजसेवक डॉ. अनिल अवचट, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, सत्यपाल महाराज व डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांचा समावेश आहे.

या पाचही माजी अध्यक्षांनी सरकारला दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोलीची दारूबंदी तेथील जनतेच्या मागणीमुळे करण्यात आली आहे व ती प्रभावी आहे. ती आदिवासी, स्त्रिया व व्यसनी पुरुष तिघांनाही सुरक्षा देते. दारूबंदी उठवण्याचा अजिबात विचार करू नये. उलट 27 वर्षांपासून असलेल्या या दारूबंदीला अजून मजबूत करावे. तसेच गडचिरोलीतील प्रभावी पद्धत शेजारच्या चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांनाही लागू करावी. राज्यात कोविडची प्रचंड साथ सुरू आहे. तिला समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न जनता व सरकार करीत असताना एक भलतेच संकट राज्य सरकार ओढवून घेत आहे. 

तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

गडचिरोली जिल्ह्यात गेली 27 वर्षे व चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांपासून लागू असलेली दारूबंदी उठविण्यासाठी शासकीय समिती नेमण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात आधीच प्रचंड प्रमाणात दारू आहे. दारूमुळे पुरुष व्यसनी, स्त्रिया असुरक्षित व गरीब अजून गरीब आणि आदिवासी उद्‌ध्वस्त होतात. राज्यात केवळ वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर या तीन सलग जिल्ह्यांत म्हणजे एकूण सुमारे 50 लाख लोकसंख्येच्या प्रदेशात दारूबंदी आहे. ती कमी अधिक प्रमाणात प्रभावी आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात व्यापक लोक चळवळीनंतर 27 वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. ती आदिवासी, स्त्रिया व व्यसनी पुरुष तिघांनाही संरक्षण देते. स्त्रिया, आदिवासी, ग्रामसभा व जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांचे तिला सक्रिय समर्थन आहे. नुकतेच 530 गावांनी "दारूबंदी कायम हवी, अजून मजबूत करा', अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरासरीपेक्षा येथे दारू 87 टक्‍क्‍यांनी कमी आहे. असे असताना केवळ कररूपाने पैसा किंवा राजकीय स्वार्थ यासाठी ही दारूबंदी उठविण्याचा विचार चूक आहे. 

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

व्यसनमुक्तीसाठी दारूबंदी आवश्‍यक आहे. शासनाने आम्हाला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे अध्यक्ष निवडून आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीच्या भावनेतून आम्ही आपल्याला विनंती करतो की, गडचिरोली व चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा विचार करण्यासाठी समिती स्थापना रद्द करावी. उलट चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी गडचिरोलीसारख्या प्रभावी पद्धतीने अजून मजबूत करावी, असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक/समाजसेवक डॉ. अनिल अवचट, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, सत्यपाल महाराज व डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी हे संयुक्त आवाहन केले आहे. हे सर्व शासनाच्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state governemnt should continue wine banned in gadchiroli district said doctor bang