राज्यातील विद्यार्थी "पिसा'मध्ये होणार सहभागी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नागपूर - राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचेच काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या "प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट्‌स असेसमेंट' (पिसा) परीक्षेमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा 2017 मध्ये सहभाग नोंदविणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली.

नागपूर - राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचेच काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या "प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट्‌स असेसमेंट' (पिसा) परीक्षेमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा 2017 मध्ये सहभाग नोंदविणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली.

गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, डायट प्राध्यापकांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. नंदकुमार म्हणाले, ""प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानातून तंत्रस्नेही शिक्षकांची निर्मिती करण्यात आली. या शिक्षकांचा वापर करून राज्यात पहिल्या टप्प्यात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात एक हजारावर शाळा; तर पुढे चाळीस हजार शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येतील.''

""विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच परीक्षा घेण्यात येतात. त्यात "ऑर्गनायझेशन फॉर इकॉनामिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट'द्वारे (ओईसीडी) "पिसा'चे आयोजन केले जाते. त्यातून जगभरातील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत कुठे आहेत, याची तपासणी केली जाते. त्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. या परीक्षेत यापूर्वी देशामधील तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, त्यांचा क्रमांक शेवटून पहिला आणि दुसरा आला. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने एकदाही त्या परीक्षेत सहभाग नोंदविलेला नाही. त्यामुळे जगातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपल्या देशातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कुठे आहे हे कळते. मात्र, आता राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांची टीम तयार झाली आहे. त्यातून या शाळांतील विद्यार्थ्यांना त्या दर्जाचे शिक्षण देत, गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचे प्रयत्न सुरू होईल. 2017 मध्ये या परीक्षेत राज्यातील विद्यार्थी बसतील. 2021 मध्ये त्यातून अपेक्षित निकाल मिळेल,'' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: state students will participate in PISA