उड्डाणपुलावरून पोलिसावर फेकला दगड; सीसीटीव्ही फुटेज तपासले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलावरून पोलिसावर फेकला दगड; सीसीटीव्ही फुटेज तपासले

उड्डाणपुलावरून पोलिसावर फेकला दगड; सीसीटीव्ही फुटेज तपासले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दिवसा संचारबंदीत शिथिलता दिल्यानंतर रात्रीला मात्र शहरात संचारबंदी सुरूच होती. त्या काळात राजकमल चौकात राज्य राखीव पोलिस दलाच्या ड्यूटीवर तैनात पोलिस शिपायावर टवाळखोराने चार ते पाच किलो वजनाचा दगड फेकल्याने चांगलीच तारांबळ उडाली. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

शहरात जागोजागी पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफचे शिपाई तैनात आहेत. राजकमल चौकात रात्रीला एक दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून जाताना शिपाई अंभोरे यांना दिसला. त्यांनी सदर व्यक्तीला खालूनच हटकले असता त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर ३० फूट उंचीवरून खाली तैनात पोलिसाच्या अंगावर पाच किलो वजनाचा दगड फेकून हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एसआरपीएफ शिपाई त्यातून सुखरूप बचावला.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात आढळले साडेबारा हजारापेक्षा अधिक महुमेही रुग्ण

पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला; मात्र तो उड्डाणपुलावरूनच राजापेठच्या दिशेने पळाला. एसआरपीएफच्या शिपायाने या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास दिली. या घटनेनंतर शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजतापासून राजकमल ते राजापेठ पोलिस ठाणे जेथे उड्डाणपूल संपतो तेथपर्यंत असलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यासाठी उपायुक्त विक्रांत साळी, कोतवालीच्या पोलिस निरीक्षक नीलिमा आरज, राजापेठचे निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यासह जवळपास २५ ते ३० जणांचा ताफा या मार्गावर तैनात होता.

अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिस व्यापारी प्रतिष्ठानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे बघून अनेकांना आश्चर्य वाटले. परंतु, ही प्रक्रिया पोलिसांच्या तपासाचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सायंकाळपर्यंत यासंदर्भात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू होती.

"उड्डाणपुलावरून दगड फेकून पळ काढलेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध संबंधित शिपायास कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले. दगड फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे."

- विक्रांत साळी, पोलिस उपायुक्त, अमरावती

loading image
go to top