
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास थांबविण्यात यावा, खरेदी मर्यादा एकरी २० क्विंटल करण्यासह धान खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. होळी यांनी धान खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांना दिले.
धानोरा (जि. गडचिरोली) : राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या धान खरेदीची प्रक्रिया अत्यंत किचकट असून दुर्गम भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वतःचे धान विक्रीकरिता अनेक दिवस वाट पहावी लागत आहे. शासनाच्या या चुकीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर स्वीकारले जात नसल्याचा गंभीर आरोप होत आहे.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास थांबविण्यात यावा, खरेदी मर्यादा एकरी २० क्विंटल करण्यासह धान खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी करण्यात येत असलेल्या धानोरा येथील आंदोलनाप्रसंगी केली.
यावेळी धानोरा भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, भाजप नेते साईनाथ साळवे, अंतू साळवे, पंचायत समिती सभापती अनसूया कोरेटी, नगर परिषद उपाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, नगरसेवक विनोद निंबोरकर, सारंग साळवे, विजय कुमरे, महादेव गणोरकर, राकेश उइके, सुभाष धाईत, माधव गोटा, देवराव नरोटे, महादेव गणोरकर, तुकाराम सहारे, बंडू म्हशाखेत्री, गणेश पदा, संजू कुंडू, गणेश लोनबले, लाला राऊत यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
१ जानेवारीपासून आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यांत धान्य खरेदीची मर्यादा २० क्विंटल करावी, अतिक्रमण व वनहक्कधारक शेतकऱ्यांना धान खरेदीसह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
अवश्य वाचा - बापरे! गडचिरोली जिल्हा परिषदेत तब्बल १३६३ पदे रिक्त,...
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी धानोरा तालुक्यातील कारवाफा, चातगाव, दुधमाळा, धानोरा येथील धान्य खरेदी केंद्रावर आंदोलनासाठी आले होते. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देत धान खरेदी करण्यास आलेल्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवावे व त्यांचे धान जलदगतीने कसे घेता येईल, यासंदर्भात व्यवस्था करावी, असे निर्देश दिले.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)