वादळी वाऱ्यामुळे गहू पिकांसह केळी बागा उद्‍ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक गावातील घरावरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आला़.

बाळापूर (जि. अकोला) : तालुक्यात शनिवारी (ता.4) अचानक वादळी वाऱ्यासह बरसलेल्या गारपीट व पावसामुळे गाजिपूर, मोदापूर, सातरगाव शेतशिवारातील केळी आडवी पडली असून, हरभरा व मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सर्व्हेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा- सात पिढ्यांच्या परंपरेत खंड; वाचा काय झाले असे?

संसार आला़ उघड्यावर
शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक गावातील घरावरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आला़. वीज तारा तुटल्याने नागरिक रात्रभर अंधारात राहिल्याने प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. बाळापूर तालूक्यात पाच वाजेच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली़.

हेही वाचा- ...म्हणून ‘गावरान’वर वाढला जोर अन् आले पोलिसांच्या रडावर

केळी बाग झाली नष्ट
पावसाच्या प्रारंभी सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली तर नंतर वादळाला सुरुवात झाल्यानंतर शेतशिवारात उभे असलेले पीक पूर्णतः उध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बाळापूर तालुक्यातील सातरगाव, गाजिपूर शेतशिवारात असलेल्या मका व केळीला बसला़. शेतकरी शामराव शेलार यांच्या चार एकरावरील केळीची बाग नष्ट झाली आहे. तर मनोज ठाकूर, मदनसिंग नेरवैया, टिळक ठाकूर यांच्या शेतातील काकडी, कांदा, गहू व केळीचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे पंधरा एकरावरील केळीच्या बागा आडव्या पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सर्व्हेची केली मागणी
गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सातरगाव शेतशिवारातील पन्नास ते साठ एकर गहू व अकरा एकर केळींच्या बागा पूर्णतः उध्वस्त झाल्या आहेत. माझी चार एकरावरील केळीची बाग, कांदा अक्षरशः झोपला आहे. त्यामुळे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने सर्व्हेक्षण करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी.
-श्‍यामराव शेलार, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stormy winds destroy banana gardens with wheat crops