समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी

चेतन देशमुख 
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : निवडणुकीच्या तारखा जस जशा जवळ येत आहेत. तसं तसा प्रचार आणि प्रसाराच्या कामाला गती आली आहे. कमी वेळात जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर नेते, कार्यकर्त्याकडून होत आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याने सध्या समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

यवतमाळ : निवडणुकीच्या तारखा जस जशा जवळ येत आहेत. तसं तसा प्रचार आणि प्रसाराच्या कामाला गती आली आहे. कमी वेळात जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर नेते, कार्यकर्त्याकडून होत आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याने सध्या समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

यवतमाळ विधानसभा
यवतमाळ विधानसभेत भाजप, कॉंग्रेस तसेच शिवसेना बंडखोर अशी लढत होणार आहे. यासोबतच वंचित, प्रहार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपतर्फे "पुन्हा आणू या आपले सरकार' या टॅगलाइन सोबतच "आपला माणूस, साधा माणूस' असे म्हणत समाजमाध्यमांवर प्रचाराची राळ उठविली आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे व्हिडिओ व्हायरल केल्या जात आहेत. भाजपच्या या प्रचाराला उत्तर देण्यासाठी कॉंग्रेस सोशल मीडिया सेल तसेच कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. 'जनसामान्याचा निर्धार' या टॅगलाइनचा वापर सुरू केला आहे. अपक्ष उमेदवारही प्रचारात मागे नाहीत. शिवसेना बंडखोर उमेदवारांनी 'लोकांच्या सेवेत नेहमी तत्पर, टंचाईच्या काळात पाणी पाजणारा माणूस' अशा आशयांच्या पोस्ट तयार केल्या आहेत.

पुसद विधानसभा
पुसदमध्ये नाईक बंधूंची थेट लढत होणार आहे. भाजपकडून "राजतिलक की करो तयारी' या स्लोगनचा प्रभावी वापर करणे सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून "ध्यास जनसेवेचा, आपला माणूस' कॅच लाइनवर प्रचाराची भिस्त आहे.

राळेगाव विधानसभा
राळेगाव विधानसभेत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. विद्यमान आमदारांकडून "दिसतोय फरक...आम्हीच परत' अशी प्रचाराची मोहीम सुरू केली आहे. कॉंग्रेसकडूनही "परिवर्तन की सुरवात' म्हणत आव्हान उभे केले आहे.

दिग्रस विधानसभा
भाजप बंडखोर माजी मंत्र्यांनी शिवसेनेला तगडे आव्हान दिग्रस मतदारसंघामध्ये उभे केले आहे. "माझी खरी ताकद, माझे कार्यकर्ते' म्हणत प्रचार रणधुमाळी सुरू केली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या संख्येने प्रसारीत केले जात आहे. लाईक आणि शेअरचा सपाटा सुरू आहे. शिवसेनेने ही या प्रचाराला जशाच तसे उत्तर दिले आहे. "भगवे वादळ', "आरोग्यदूत' अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराची मोहीम उघडली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stream of propaganda on social media