esakal | बाबू अच्छेलाल, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का जी?
sakal

बोलून बातमी शोधा

बाबू अच्छेलाल, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का जी?

बाबू अच्छेलाल, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का जी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूलचेरा (जि. गडचिरोली) : वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षितपणाचे जीवन जगणाऱ्या मूलचेरा तालुक्यातील नागरिकांना साध्या साध्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. एटापल्ली, मूलचेरा, चामोर्शी या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणारा दिना नदीवरील देवदा-रेगडी मार्गावरील पूल कित्येक वर्षांपासून रखडला आहे. सध्या मूलचेरा, एटापल्लीहून, आलापल्लीला जायचे असल्यास कच्च्या रस्त्यांसोबत नदी पार करून जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत नदी पार करणे शक्यच होत नाही. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी बाजारपेठ तर गाठावीच लागेल ना. त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास सुरू आहे. परंतु, याचे सोयरसुतक ना लोकप्रतिनिधींना आहे, ना प्रशासनाला याच्याशी काही देणेघेणे. (Struggle-for-facilities-Air-bridge-on- Devada-Regadi-route-Villagers-travel-by-river-nad86)

वनांनी समृद्ध या भागात मोठ्या प्रमाणात रानमेवा आहे. ज्याला सर्वत्र चांगली मागणी असते. याच रानमेव्यावर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. परंतु, दळणवळणासाठी रस्ते, पूल नसल्याने तब्बल २० ते २५ किलोमीटरचा फेरा घालून ग्रामस्थांना वाटचाल करावी लागते. त्यामुळे बरेचदा बाजारपेठ गाठायला उशीर होतो. खराब रस्त्यांमुळे अनेकदा माल खराब होतो.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

प्रचंड मेहनत घेऊन हाती काहीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होते. पुलाची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी विद्यमान, माजी आमदार, खासदारांना अनेकदा निवेदन दिले; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थ हताशपणे सांगतात. आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का, हा एकच प्रश्न ओरडून ओरडून ते या व्यवस्थेला विचारत आहेत.

नागरिकांसाठी सोयीचा रस्ता

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे कर्मवीर कन्नमवार जलाशय ज्या नदीवर आहे ती दिना नदी मूलचेरा तालुक्यातील देवदा ते रेगडी या मार्गावर आहे. ही नदी देवदा गावाजवळून वाहते. महत्त्वाचे म्हणजे कच्चा रस्ता आणि नदीचा प्रवास असला तरी या मार्गावरून बारमाही वाहतूक सुरू असते. एटापल्ली, मूलचेरा व चामोर्शी या तिन्ही तालुक्यांना जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गरंजी, वेंगणूर या गावाचे नागरिकसुद्धा धोक्याचा असला तरी याच मार्गाचा अवलंब करतात. एटापल्ली येथील सरकारी कर्मचारी तसेच अनेक गावांतील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी हाच मार्ग सोयीचा पडतो.

जोखीम स्वीकारून विद्यार्थ्यांचा प्रवास

एरवी खराब रस्त्यांवरून कसेही आपले शिक्षणाचे ठिकाण गाठणारे विद्यार्थी, नागरिकांची पावसाळ्यात पंचाईत होते. थोड्याही पावसात नदीचे पाणी वाढते. तरीही अनेक जण जीव धोक्यात घालून प्रवास करतात. यात शिक्षणासाठी दुसऱ्या तालुक्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. एकीकडे देशात विकासाची गंगा प्रावहित होत असताना दुर्लक्षित असलेल्या या भागतील स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या सोयीसाठी पूल करावासा वाटत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला शक्य होईल तेवढ्या लवकर दिना नदीच्या काठावर पुलाची निर्मिती करू, असे आश्वासन खासदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहे. पूल झाल्यास देवदा गावात दळणवळण वाढेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. एकंदरीत पुलाच्या निर्माणावर स्थानिकांची प्रगती अवलंबून आहे.
- युधिष्ठिर बिस्वास, जिल्हा परिषद बांधकाम व वित्त सभापती

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

देवदा गाव दिना नदीच्या काठावर वसलेले आहे. पुलाअभावी मुख्य मार्गच नसल्याने गावात सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे या मार्गावर दिवसभरात एकच बस आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पुलासाठी काही वर्षांपूर्वी या भागात सर्व्हेसुद्धा झाला. परंतु प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही ते नाहीच.
- प्रवीण मोहुर्ले, उपसरपंच, रेगडी

(Struggle-for-facilities-Air-bridge-on- Devada-Regadi-route-Villagers-travel-by-river-nad86)

loading image