दुसऱ्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासून केले अनुत्तीर्ण

दुसऱ्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासून केले अनुत्तीर्ण

नागपूर : झटपट निकाल देण्याचा विक्रम सातत्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करीत आहे. मात्र, झटपट निकाल देण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आणि गुण देण्यात अक्षम्य चुका होत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार परीक्षा विभागाच्या कारभारामध्ये दिसून आला आहे. भलत्याच विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासून एका विद्यार्थिनीला अनुत्तीर्ण असल्याचा निकाल देण्याचा प्रताप परीक्षा विभागाने केला आहे. यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 
मोहता कॉलेज ऑफ सायन्स नागपूरची बीएस्सी चौथ्या सत्राची विद्यार्थिनी आहे. तिने मे 2019 मध्ये परीक्षा दिली होती. परीक्षेत तिचा बैठक क्रमांक 478084 होता. या परीक्षेचा निकाल 1 ऑगस्टला जाहीर झाला. गुणपत्रिकेमध्ये प्राणिशास्त्र पेपर-1 या विषयात तिला शून्य गुण देण्यात आले. विद्यार्थिनीला या निकालावर विश्‍वास नसल्याने तिने 7 ऑगस्टला विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मागितली. एका महिन्यानंतर छायांकित प्रत विद्यार्थिनीच्या ई-मेलवर पाठविण्यात आली. ई-मेल पाठविण्यात आलेली फाइल करप्ट असल्यामुळे ती वाचताच आली नाही. त्यामुळे या विद्यार्थिनीने पुन्हा एकदा परीक्षा विभागाला मेल करीत उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पुन्हा पाठविण्याची विनंती केली. यावर विद्यापीठाने पुन्हा एकदा तिला गुणपत्रिकेची छायांकित प्रत पाठविली. मात्र, या छायांकित प्रतीचे अवलोकन केले असता दुसऱ्याच एका विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक असणारी गुणपत्रिका पाठविण्यात आली होती. विद्यार्थिनीने सांगितलेल्या माहितीनुसार, तिने प्राणिशास्त्राच्या पेपरमध्ये सर्व प्रश्‍न सोडविले होते. असे असतानाही शून्य गुण मिळाल्याने तिला धक्काच बसला होता. त्यात आता विद्यापीठाने असा घोळ करीत विद्यार्थ्यांच्या जिवावर उठण्याचा प्रकार सुरू केला आहे. विद्यापीठाच्या या गोंधळामुळे संबंधित विद्यार्थिनीने पुन्हा एकदा स्वत:चा बैठक क्रमांक पाठवून त्या क्रमांकाची छायांकित प्रत पाठविण्याची विनंती केली आहे. असे न झाल्यास विद्यार्थिनीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. परीक्षा विभागाकडून वेळेत निकाल लावले म्हणून अनेकदा पाठ थोपटून घेतली जाते. मात्र, परीक्षा विभागाने चक्क दुसऱ्याच विद्यार्थ्याची गुणपत्रिका तपासून संबंधित विद्यार्थिनीला अनुत्तीर्ण ठरविले. या प्रकाराने विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com