शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून दीडशे विद्यार्थ्यांना शाळेतून परत पाठविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सावनेर : शाळेची थकीत शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना शाळेतून परत पाठविल्याचा धक्कादायक प्रकार सावनेर येथे घडला. या प्रकारामुळे पालक चांगलेच संतापले. त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी शाळेसमोर गर्दी केली. या प्रकरणाची चर्चा सावनेरमध्ये दिवसभर होती. 

सावनेर : शाळेची थकीत शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना शाळेतून परत पाठविल्याचा धक्कादायक प्रकार सावनेर येथे घडला. या प्रकारामुळे पालक चांगलेच संतापले. त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी शाळेसमोर गर्दी केली. या प्रकरणाची चर्चा सावनेरमध्ये दिवसभर होती. 
सावनेर शहारापासून तीन किलोमीटर अंतरावर साहेबराव विरखरे यांची सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत गेले. त्यातील जवळपास दीडशेच्यावर विद्यार्थ्यांना शाळेत बसू न देता परत पाठविण्यात आले. शाळेत गेलेला पाल्य लवकरच घरी आल्याने पालकही आश्‍चर्यचकित झाले. मुलांना घरी परत पाठवण्यात आल्याने पालकांनी याचा जाब विचारण्यासाठी शाळेत गर्दी केली होती. परत पाठविण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुल्क भरले असल्याचे माहिती मिळाली आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना परत पाठविल्याने, पालक वर्गानी संतप्त प्रतिक्रिया देत आपण फी का भरली नाही यावर भाष्य न करता शाळा व्यवस्थापनास धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेत शुल्क जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक शिमला सिंग यांना विचारणा केली असता त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, असे करण्यास आम्हाला बाध्य व्हावे लागले असेही सांगितले. त्या म्हणाल्या, शाळा व्यवस्थापन नेहमीच पालकांच्या आर्थिक समस्या जाणून त्यांना योग्यतेपेक्षाही जास्त मुभा उपलब्ध करून देते, परंतु स्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्यावर मात्र असे कठोर पाऊल उचलण्यास बाध्य व्हावे लागते. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले, बाहेर काढले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारामळे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करू, असेही मुख्याध्यापकांनी सांगितले. 
पालकांनी नोंदविला निषेध 
घडलेला प्रकार चुकीचा होता. पालकांच्या दिरंगाईमुळे जरी हे घडले असले तरी असे व्हायला नको होते. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणार होऊ शकतो असे सांगून पालकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. 
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पगार द्यावा लागतो, दिवाळीसारख्या सणाआधी सर्व कर्मचाऱ्यांना पगार देण्याकरिता शाळा व्यवस्थापनास वेगळी व्यवस्था करावी लागली. ही परिस्थिती जाणून न घेता पालकांनी रोष व्यक्त केला. ते करण्याआधी असे का घडले, याला जबाबदार कोण? यावर विचार न करता बिनबुडाचे आरोप, प्रत्यारोप करणे योग्य नाही. 
- साहेबराव विरखरे, संचालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student sent back to home for not paying fees