विद्यार्थ्यांनी केला वृक्षकदिन साजरा...मोठ्यांना दिले वृक्षसंवर्धनाचे धडे

रूपेश खैरी
Sunday, 6 September 2020

वृक्ष बचाओ नागरिक समितीद्वारे वृक्षांकडून शिकू या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाग्राम मार्गावर विद्यार्थ्यानी दुतर्फा झाडांखाली जनजागृतीपर सुविचार, वृक्षचित्रावली, निसर्ग कवितांचे फलक लावले होते. या उपक्रमात सहभागी या बालगोपालांनी निसर्गगीते, कविता आणि नाट्यछटाही सादर केल्या.

वर्धा : शिक्षकदिनी शालेय विद्यार्थ्यांनी सेवाग्राम मार्गावरील वृक्षांसमोर उभे राहून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करीत मार्गस्थांना वृक्षसंवर्धनाचे धडे दिले. वृक्ष हे समाजाचे शिक्षक आहेत, या भावनेतून मुलामुलींनी आगळावेगळा वृक्षक दिवस साजरा केला आणि सर्वानी पर्यावरणाचे रक्षक बनावे, ही शिकवणही दिली.

वृक्ष बचाओ नागरिक समितीद्वारे वृक्षांकडून शिकू या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात आनंद निकेतन, सुशील हिम्मतसिंगका विद्यालय, कस्तुरबा विद्यालय, अग्रगामी या शाळांमधील विद्यार्थ्यांसह मगन संग्रहालय परिवार, चेतना विकास, आसमंत स्नेहालय येथील बालके सहभागी झाली होती. यावेळी सेवाग्राम मार्गावर विद्यार्थ्यानी दुतर्फा झाडांखाली जनजागृतीपर सुविचार, वृक्षचित्रावली, निसर्ग कवितांचे फलक लावले होते. या उपक्रमात सहभागी या बालगोपालांनी निसर्गगीते, कविता आणि नाट्यछटाही सादर केल्या.

सांगितल्या वृक्षसंवर्धनाच्या गोष्टी

केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील वृक्षसंवर्धनाच्या गोष्टी सांगितल्या. चिपको आंदोलन, उत्तरांचल व राजस्थानमधील आंदोलन, साधना फॉरेस्टची गोष्ट, जॉनी ऍपलच्या वृक्षप्रेमाची दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट, ऍमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेली आग अशा अनेक विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.

नाटिकेतून झाडांचे आत्मकथन सादर

झाडांचे आत्मकथन नाटिकेतून सादर करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रकाश संश्‍लेषण, झाडे किती प्रमाणात प्राणवायू देतात, वर्ध्यातील लोकसंख्या आणि झाडांचे प्रमाण इथपासून तर ग्रीन हाऊस इफेक्‍टपर्यंत शास्त्रशुद्ध विषयही सहजतेने मांडले. कडुलिंबापासून सॅनेटायझर कसे बनवावे आणि दशपर्णी अलिंबोळीच्या अर्काची उपयुक्तता यासारखी तांत्रिक व प्रयोगशील माहितीही या विद्यार्थ्यांनी दिली.

जाणून घ्या : विरोधी पक्षाला दुसरा धंदाच नाही; कोणी केले हे विधान व का? वाचा सविस्तर

मुलांनी रेखाटलेली रंगचित्रे आकर्षक

चित्रांसाठी कोऱ्या करकरीत ड्रॉइंग शीट न वापरता जुन्या वर्तमानपत्रावर मुलांनी रेखाटलेली रंगचित्रे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी विविध सामाजिक, निसर्गप्रेमी, पर्यावरणस्नेही संघटनांच्या सदस्यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. आम्ही वृक्षांची लेकरे हे सांगत शासनाने वृक्षतोड थांबवावी, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students celebrated Tree Day