विद्यार्थ्यांना पोषण आहार उशिरा का मिळतोय?

रूपेश खैरी
Tuesday, 27 October 2020

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील 56 दिवसांचा आहार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 5 किलो 600 ग्रॅम तांदूळ, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 8 किलो 400 ग्रॅम तांदूळ देण्यात येणार आहे.

नंदोरी(जि.वर्धा): शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्य आदी वस्तूंचे नियमित वाटप करणे आवश्‍यक आहे. अनेक जिल्ह्यांनी पुरवठादारांकडे धान्य आणि सोबत काही वस्तूंची मागणी नोंदविण्यासाठी विलंब केल्याने त्याचा प्रत्यक्ष योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळवून देण्यास विलंब होत आहे. 

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे आवश्‍यक असून त्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - पानपिंपळीसह मुसळी औषधी वनस्पती नेस्तनाबूत होण्याचा...

उन्हाळी सुट्टीतील 34 दिवसांचा आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. त्यानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीतील आहार पुरविण्यात आला. तांदूळ व अन्न शिजवून देण्याच्या खर्चाच्या दराच्या मर्यादेपर्यंत धान्य आणि इतर वस्तू विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्यात येते. अमरावती, नांदेड, परभणी या जिल्ह्यात न्यायालयीन प्रकरणे असल्याने काही तांत्रिक कारणास्तव पुरवठादारांसोबत अद्यापही करारनामे करणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत राहील याचे नियोजन करावे. नियमित पुरवठादार व तालुका स्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करावी, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - वाघोबा लपलेय कुठे? ड्रोन; स्निफर डॉगची मदत घेऊनही सापडेना, कर्मचारी हतबल

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील पोषण आहाराचे नियोजन -
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील 56 दिवसांचा आहार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 5 किलो 600 ग्रॅम तांदूळ, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 8 किलो 400 ग्रॅम तांदूळ देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन एक कडधान्य व डाळही देण्यात येणार आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी 19 ऑक्‍टोबरपर्यंत पुरवठादारांकडे तांदूळ व धान्य आदी वस्तूंची मागणी नोंदविणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students getting nutritious food late in wardha