वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांची अनोखी शक्‍कल, घरीच तयार केले सीडबॉल आणि...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर हा उपक्रम नेहरू युवा केंद्र व गुरुदेव सेवा मंडळ, धामणगाव रेल्वे समितीद्वारे घेण्यात आला. यात धामणगाव तालुक्‍यात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक व युवक मंडळाद्वारे वृक्षरोपण करण्यात आले.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वृक्षारोपणाचे कार्य अखंड सुरू ठेवले. यंदाही सर्व स्वयंसेवकांनी आपल्या गावात आजूबाजूच्या परिसरात झाडे लावून वृक्षारोपण केले. 'सेल्फी विथ ट्री' संकल्पनेद्वारे एकाच दिवशी शंभर झाडांचे रोपण केले. गतवर्षीप्रमाणे रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावी थोडे थोडे करून जवळपास दोन हजार सीड बॉल विद्यार्थ्यांनी बनवून ओसाड जागेवर फेकले आणि वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा हा वसा कायम ठेवला. यात महाविद्यालयाचे प्राचार्य योगेंद्र गांडोळे, महिला कार्यक्रम अधिकारी माधुरी कोपुलवार, प्रा. श्रीकांत पाटील, डॉ चिंचमलातपुरे (क्रीडा विभाग), एनसीसी अधिकारी ले. अमोल बंड व इतर शिक्षक सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र नागपुरे यांनी 'फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी 'आदर्श गुरू व पर्यावरण संवर्धन' विषयावर संवाद साधला. राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर हा उपक्रम नेहरू युवा केंद्र व गुरुदेव सेवा मंडळ, धामणगाव रेल्वे समितीद्वारे घेण्यात आला. यात धामणगाव तालुक्‍यात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक व युवक मंडळाद्वारे वृक्षरोपण करण्यात आले.

बापरे...चोरट्यांच्या टोळीत चक्‍क पोलिस हवालदार, असा झाला भंडाफोड...

गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस. आई वडील, शिक्षक, मित्र, आप्तेष्ट तसेच निसर्गसुद्धा मानवाला खूप काही देतो. आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो. अशा शुभदिनी राष्ट्रीय सेवा योजना पथक, सर्व स्वयंसेवक, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपासक व नेहरू युवा केंद्राशी संलग्न सर्व युवक मंडळ यांनी आपापल्या परिसरात एक वृक्ष लावून निसर्गाला गुरुदक्षिणा देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.

या उपक्रमात साहील कांबळे, पवन शेंडे, ऐश्वर्या काळे, तेजस भागवत, ऋषभ ठाकरे, चंचल पंचबुद्धे, रेवती गिधाने, प्रणित दुबे, कुणाल हटवार, राधा वैद्य, दीपाली ठाकरे, आकाश महात्मे, निशांत झेले, प्रज्ञा स्वास्तिक, रिद्धी व सिद्धी भांडे, सोमेश शिंदे, प्रतीक्षा गडलिंग, सत्यजित जगताप आदी रासेयो विद्यार्थ्यांशिवाय माजी स्वयंसेवक नीलेश मोहकार, विशाल मोकाशे, विलास नागोसे, मोहन गोपाळ, मयूरी गायकवाड (कोल्हे), शुभम जुनघरे व नेहरू युवा केंद्र, अमरावती, रमेश ठाकरे गुरुजी, जळगावचे जिल्हाधिकारी समवेत स्वप्निल रंधे यांनीसुद्धा सहभाग नोंदविला. सर्वांनी त्यांच्या जागेवर वृक्ष लावून उत्तम प्रकारे पर्यावरण संवर्धनास योगदान दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students made seedballs at home for planting