यशोगाथा : बोपाबोडीच्या टरबुजाची चव चाखली का?...मागणी केली पाटणावासींनी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

बोपाबोडी गावातील प्रगतिशील महिला शेतकरी लता कालिदास डोंगरवार यांनी टरबुजाची अत्याधुनिक शेती केली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या टरबुजाला इतर राज्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील टरबुजाची चव बिहार राज्यातील पाटणा येथे पोहोचली आहे. त्यामुळे बोपाबोडी गाव देशाच्या नकाशावर आले आहे.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील बोपाबोडी येथील शेतकरी महिला लता डोंगरवार यांच्याकडे स्वतःची 20 एकर शेती असून त्यांनी चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. अशा एकूण 24 एकर शेतीत त्यांनी टरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. 2007 पासून त्या टरबुजाची शेती करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी केळी, हळद यांचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या टरबुजाला उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून मागणी आली आहे.

टरबुजाच्या उत्पादित मालाला मागील वर्षी 10 ते 11 रुपये किलो बाजारभाव मिळाला होता. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमुळे बाजारभावात घसरण झाली. टरबुजाचे भाव पाच ते सहा रुपये किलोवर आले. टरबुजाचे उत्पादन झाल्यानंतर त्याच जागेवर काटेकोहळ्याचे (खाण्यासाठी तसेच हल्दीरामचा पेठा तयार करण्यासाठी) उत्पादन घेण्यात येणार आहे. परंतु या वर्षी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने टरबुजाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

यंदा उत्पादनात घट आली

मागील वर्षी एका एकरमध्ये सरासरी 24 ते 25 टन टरबुजाचे उत्पादन झाले होते; तर यावर्षी ते उत्पादन 16 ते 17 टनावर आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टरबुजाचे उत्पादन कमी झाल्याचे महिला शेतकरी लता डोंगरवार यांनी "सकाळ'ला सांगितले. तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक मनोज भालाधरे व कृषी पर्यवेक्षक अपूर्वा गहाणे यांनी नुकतीच डोंगरवार यांच्या टरबूज शेतीला भेट दिली आहे.

कृषी विभागाच्या परवानगीनेच पाठविले टरबूज

एका बाराचाकी वाहनामध्ये 21 टन टरबुजाची वाहतूक करता येते. त्यामुळे मंगळवारी (ता. 21) बोपाबोडीवरून उत्तर प्रदेशातील बनारस येथे टरबूजचा ट्रक पाठविण्यात आला; तर बुधवारी (ता. 22) बोपाबोडीवरून बाराचाकी वाहनातून पाटणा (बिहार) येथे बाजारपेठेत टरबूज पाठविण्यात आला आहे. सध्या लॉकडाउन असल्याने कृषी विभागाकडून परवानगी घेऊनच दुसऱ्या राज्यात हा माल पाठविला जातो, असे तालुका कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

जाणून घ्या : तिथे गाळली जातेय हजारो लीटर दारू; महिलेचाही सहभाग

शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करावे
मी पदवीधर आहे. सध्या टरबुजाची शेती केली आहे. यानंतर त्याच जागेवर काटेकोहळ्याचे उत्पादन घेणार आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी टरबूजच्या उत्पादनात घट झाली आहे. भावदेखील कमी आहे. शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेती करावी.
- लता कालिदास डोंगरवार, प्रगतिशील शेतकरी, बोपाबोडी.

हेही वाचा : दारू प्रेमींची नवी शक्कल, दुधाच्या कँनमधून पोहोचतेय दारू

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांसाठी ठिंबक संच, मलचिंग पेपर अनुदान, शेततळे, शतकोटी वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदी विविध योजना आहेत. तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती देण्यात येते. शेतकऱ्यांनी नवीन पिकांचे उत्पादन घ्यावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
- किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, सडक अर्जुनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story : Did you taste the watermelon of Bopabodi? went to Patna