टीव्ही, मोबाईलपासून दूर राहून केला अभ्यास; एमएच-सीईटीत मोठे यश

टीव्ही, मोबाईलपासून दूर राहून केला अभ्यास; एमएच-सीईटीत मोठे यश

यवतमाळ : घरात केबल टीव्ही नाही, शिक्षण घेणार्‍याकडे स्वत:चा मोबाईल नाही. काम पडलेच तर पालकांचा मोबाईल तात्पुरता वापरला जातो. मोबाईल न वापरता आठ ते दहा तास अभ्यास करून यवतमाळच्या अभयने एमएच-सीईटीमध्ये 99.975 पर्सेटाईल प्राप्त केले आहेत. याशिवाय जेईई मेन्समध्ये त्याने 99.57 पर्सेटाईल मिळविले आहेत. त्याने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल काल मंगळवारी (ता.4) सकाळी जाहीर झाला. त्यात यवतमाळच्या अभयने हे यश मिळविले आहे. अभयचे शिक्षण यवतमाळातच सुरू आहे. वडील आशीष बाफना हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्यांचा माळीपुरा येथे बेसन बनविण्याचा कारखाना आहे. बहीण सुमंगलासुद्धा यवतमाळात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

घरातूनच इंजिनिअर होण्याचे मार्गदर्शन अभयला मिळाले आहे. घरीच व्यवसाय व शेती असल्याने भविष्यात मेकॅनिकल किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेण्याचा मानस असल्याचे अभयने सांगितले. घरात सुरुवातीपासूनच केबल टीव्ही नाही, शिक्षण घेणार्‍यांनी मोबाईलपासून दूर राहावे, यावर पालकांचा कटाक्ष आहे. त्यामुळे पालकाशिवाय घरात कोणीही मोबाईलचा वापर करीत नाहीत. आजही आम्ही लँडलाईनचा वापर सर्वाधिक करीत असल्याचे अभयचे काका मनीष बाफना यांनी सांगितले. याशिवाय रात्री दहानंतर जागरण करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात अभ्यास करण्याची सवय पडली. या सर्व कारणांमुळे अभयला दहावीत 98.40 टक्के, तर बारावीत 94.77 टक्के मिळाले.

बहीण सुमंगला हिला बारावीत 93.80 टक्के मिळाले. ऑक्टोबरपासून बारावीचा अभ्यास सुरू केला आणि जास्तीत जास्त वेळ पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी दिल्याचे अभयने सांगितले. नियमीत ध्यानयोग करणे, पियानो वाजविणे, धार्मिक पुस्तके वाचण्याचा अभयला छंद आहे. अभ्यासाचे नियोजन, सातत्य व शिक्षण घेताना मोबाईलपासून दूर राहिल्यास यश मिळते, असा विश्‍वास अभयने दैनिक ’सकाळ‘शी बोलताना व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com