महिलेचा मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अमरावती : पती, तसेच तळेगाव दशासरच्या ठाणेदारांवर जाच करीत असल्याचा आरोप करून एका महिलेने सोमवारी (ता. 22) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मुलगी व मुलासह अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

अमरावती : पती, तसेच तळेगाव दशासरच्या ठाणेदारांवर जाच करीत असल्याचा आरोप करून एका महिलेने सोमवारी (ता. 22) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मुलगी व मुलासह अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
36 वर्षीय सदर दिव्यांग महिला तिच्या मुली व मुलासह देवगाव (ता. धामणगाव रेल्वे) येथे वेगळी राहते. तिचा पती सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्याच्याविरोधात तिचे कौटुंबिक वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यात तिला खावटीसुद्धा मंजूर झाली. न्यायालयाने तिच्या संरक्षणाचा आदेश दिला आहे, तिच्या वडिलांनी तिला प्लॉट घेऊन दिला आहे. असे असताना, पती प्लॉटवर येऊन शिवीगाळ आणि मारझोड करतो, असा आरोप सदर महिलेने या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. 2015 पासून हा जाच सुरू आहे. त्याच्या तक्रारी तळेगाव दशासर ठाण्यात अनेकदा नोंदविल्या. त्यात गुन्हे दाखल असूनही पोलिसांनी पतीला अटक केली नाही. पती सीआरपीएफमध्ये असल्याने तो तळेगाव पोलिसांना मॅनेज करतो, असा आरोपही या निवेदनात केला आहे.
पती व पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून सदर महिला मुलगा व मुलीला घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात आल्या. त्यांच्या हातात पेट्रोल असलेली बॉटल होती. त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला असता, ड्यूटीवर तैनात महिला पोलिसांनी धाव घेऊन तिच्या हातातील बॉटल हिसकावली व पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. नंतर सदर महिलेने अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे यांना निवेदन सादर केले. दिव्यांग महिलेसह तिच्या मुलांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी ठाण्यात नेले. उशिरापर्यंत या प्रकरणी सदर महिला, तिची मुलगी व मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

देवकर दाम्पत्यांचा कौटुंबिक वाद आहे. त्यांच्या परस्परविरुद्ध तक्रारी असून, दोघांविरुद्धही पोलिस नियमानुसार गुन्हे दाखल केले. तक्रारीकडे दुर्लक्ष केलेले नाही.
- गोपाल उपाध्याय, पोलिस निरीक्षक, तळेगाव दशासर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attempt by the children of the woman