बुलडाणा : अन् त्यानं कवटाळले मृत्यूला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- शासन काही करे ना, शेतकरी आत्महत्या थांबे ना
- पिकांची नासाडी, कर्ज मुख्य कारण
- भ्रमणध्वनीद्वारे एका मित्रालाही विष प्राशन केल्याची दिली माहिती

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा): निसर्गाने केलेली शेतकऱ्यांची अवस्था अद्यापही शासन समजून घेण्याच्या मनस्थिती नसून, बुलडाणा जिल्ह्यात दिवसापाठोपाठ आत्महत्या वाढतच आहे. ओल्या दुष्काळात सिंदखेडराजा तालुक्यामध्ये युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. 
ओल्या दुष्काळातून कुटुंबावर ओढवलेल्या संकटामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड येथील युवा शेतकरी पुत्राने विष प्राशन केल्याची घटना रविवारी (ता.17) दुपारी उघडकीस आली. त्यानंतर जालना येथे उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला. हिवरखेड पूर्णा येथील भगवान किसन नागरे यांच्याकडे साडे तीन एकर शेती आहे.
रविवारी सकाळी भगवान नागरे व त्यांची पत्नी सुनीता हे दोघेही कापसाची वेचणी करण्यासाठी शेतात गेले होते. त्यांचा मुलगा योगेश वय 30 वर्षे हा दुपारी शेतात गेला. तेथे योगेशने विष प्राशन केले. याचा थांगपत्ताही बाजूलाच असलेल्या आईवडिलांना नव्हता. मात्र, शरीरात विष भिनल्यानंतर योगेशने गावातीलच नात्याने काका असलेल्या शेषराव बाबुराव नागरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत ओल्या दुष्काळामुळे शेतातील पिकाची झालेली नासाडी तसेच वडिलांवर असलेले कर्ज आदिमुळे कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली व त्यामुळे आपण विष प्राशन केल्याचे सांगितले. याचवेळी त्याने भ्रमणध्वनीद्वारेच गावातील एका मित्रालाही आपण विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे ही वार्ता गावात पसरली. त्यातून गावातील अनेकांनी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतात योगेश बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याचे आढळून आले. तेथून त्याला तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सायंकाळी योगेशचा मृत्यू झाला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर हिवरखेड येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक योगेशच्या पश्चात पत्नी, सात महिन्याचा मुलगा, आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हिवरखेड पूर्णा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide of a young farmer in buldana