विदर्भात चार दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने सूर्याचा प्रकोप आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे.

नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने सूर्याचा प्रकोप आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. 

उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव कमी झाल्यानंतर राजस्थानमधून उष्ण वारे वाहू लागल्याने सध्या विदर्भात लाटेसदृश वातावरण आहे. विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या तापलेले आहेत. रविवारच्या तुलनेत आज नागपूरच्या (४१.४ अंश सेल्सिअस) कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली, तरी  मंगळवारपासून पारा पुन्हा उसळी घेण्याची शक्‍यता आहे. चंद्रपूरवासींसाठी सोमवारचा दिवस सर्वाधिक तापदायक ठरला. हवामान विभागाने येथे नोंदविलेले ४३.४ अंश सेल्सिअस तापमान राज्यासह मध्य भारतातही उचांकी ठरले. 

विदर्भातील अमरावती (४२.४ अंश सेल्सिअस), अकोला (४२.१ अंश सेल्सिअस), वर्धा (४२.० अंश सेल्सिअस), वाशीम (४२.० अंश सेल्सिअस), यवतमाळ (४२.० अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (४१.९ अंश सेल्सिअस) व गडचिरोली (४१.६ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही उन्हाचा तडाखा अधिक जाणवला.

उष्माघाताचे बळी?
उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा आणि नंदनवन हद्दीत घडल्या. सोमवारी दुपारी २.४० च्या सुमारास कान्होलीबारा समृद्धी कॅम्प येथे राहणाऱ्या राजू राम कटरा (२३) याची अचानक प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दुसरी घटना नंदनवन हद्दीत शीतला माता मंदिराजवळील फुटपाथवर घडली.

फुटपाथवर राहणारा पंजाबराव महादेव धोबे (७०) हा सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास  फुटपाथवर मृतावस्थेत मिळून आला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद  केली आहे.

Web Title: Summer Heat Temperature