उन्हाळी कांदा संपतोय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

अमरावती ः कांदा उत्पादक असलेल्या राज्यातील व देशातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आता संपुष्टात आला असून खरिपातील कांदा येण्यास विलंब होणार असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत कांद्याचे भाव चांगलेच कडाडण्याचे संकेत आहेत. सद्य:स्थितीत कांद्याच्या दरांमध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते सहाशे ते सातशे रुपयांनी अधिक आहे.

उन्हाळ्यातील साठवून ठेवलेल्या कांद्याची सद्य: बाजारात आवक आहे. ती ही तोकडी आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अमरावती बाजार समितीत जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निम्म्याहून अधिक संख्येने आवक घटली आहे. शनिवारी येथील बाजार समितीत प्रतीक्विंटल तीन हजार रुपये भाव मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत तो अधिक राहिला आहे. आवकमध्येही मोठी तफावत आढळून आली. नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याची आवक बंद आहे. राज्यातील काही भागात विशेषतः कांदा उत्पादक पट्ट्यात अतिवृष्टीने इतर पिकांसोबतच काद्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचे पडसाद बाजारात उमटू लागले आहेत.
उन्हाळी कांद्यातून चांगल्या उत्पादनाची हमी असते. मार्च ते मे या कालावधीत कांद्याचे उत्पादन होते. त्यानंतर पाच सहा महिने नवा कांदा येत नाही. कांद्याचे आयुर्मान चांगले असते. तो अधिक काळ साठवून ठेवता येतो. यामध्ये खर्च वाढतो, वजन कमी होते, पावसाळी वातावरणात तो खराब होण्याची शक्‍यता राहते. या सर्वाचा हिशेब केल्यास फारसा नफा हाती लागत नाही.
पुढील काळात कांद्याचे दर वधारण्याचे संकेत असले तरी ते आकाशाला मात्र भिडणार नाहीत, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे मत आहे. पावसामुळे नव्या कांद्याची लागवड लांबली आहे. त्यामुळे तो येण्यास विलंब होणार आहे. पावसात कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पुनर्लागवड करावी लागणार आहे. साठवून ठेवलेला कांदा पावसाळी वातावरणामुळे खराब होत असून प्रोत्साहन अनुदान रद्द झाल्याने निर्यातीचे प्रमाण घटल्याने देशांतर्गत बाजारात पुरेसा कांदा उपलब्ध राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer onion is ending