पाच हजार क्विंटल तूरडाळीचा पुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - राज्यात तूरडाळीची उपलब्धता पाहता, मागणीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास तूरडाळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार क्विंटल तूरडाळ उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी सांगितले. 

नागपूर - राज्यात तूरडाळीची उपलब्धता पाहता, मागणीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास तूरडाळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार क्विंटल तूरडाळ उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाकक्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तूरडाळीची  विक्री यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता गरुड, जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे, एल. जे. वार्डेकर, व्ही. एस. काळे, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए. आर. गार्वात, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, आयटीडीपीचे एपीओ नितीन इसोकार, उषा हजारे, मनोज तेलंग, डी. पी. लोखंडे, अधीक्षक जी. पी. गेडाम उपस्थित होते. 

राज्यात तूरडाळीचे सन 2017-18 मध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शासकीय गोदामांसह त्यांच्या घरात साठवून ठेवण्यात आला. शासनाच्या सूचनेनुसार शासकीय गोदाम तसेच शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तूरडाळीच्या मालाची खुल्या बाजार विक्री करण्यात येणार आहे. त्यानुसार, शासकीय स्वस्त धान्य दुकानांव्यतिरिक्त अंगणवाडी तसेच विविध शाळा, आश्रमशाळा, मध्यवर्ती कारागृह, समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना तूरडाळीचा मागणीनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय बचतगटांना प्रतिकिलो 55 रुपये दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात 13 तालुके मिळून 5 हजार क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात आली. यात सावनेर तसेच उमरेड तालुक्‍यातून प्रत्येकी 500 क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात आली. तसेच इतरही तालुक्‍यांतून 300 ते 450 क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात आल्याचे मुद्‌गल यांनी सांगितले. 

Web Title: Supply of five thousand quintals of Turdal