32 लाख 50 हजारांचे बक्षीस असलेल्या सहा नक्षल्यांची शरणागती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

गडचिरोली : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तसेच सरकारकडून 32 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या 6 नक्षल्यांनी शनिवारी (ता. 27) गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात 4 युवतींसह डीव्हीसी पदावर असलेल्या एका पुरुष नक्षल्याचाही समावेश आहे.

गडचिरोली : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तसेच सरकारकडून 32 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या 6 नक्षल्यांनी शनिवारी (ता. 27) गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात 4 युवतींसह डीव्हीसी पदावर असलेल्या एका पुरुष नक्षल्याचाही समावेश आहे.
शरणागत नक्षल्यांमध्ये गोकूळ ऊर्फ संजू सन्नू मडावी (वय 30), रतन ऊर्फ मुन्ना भिकारी कुंजामी (वय 22), सरिता ऊर्फ मुक्ती मासा कल्लो (वय 20), शैला ऊर्फ राजे मंगळू हेडो(वय 20), जरिना ऊर्फ शांती दानू होयामी (वय 29) व मीना धुर्वा (वय 22) यांचा समावेश आहे. गोकूळ मडावी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 4 च्या विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर चकमकीचे 15, खुनाचे 3 व भूसुरुंगस्फोटाचे 6 गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर 8 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. 27 एप्रिल रोजी दराची येथे झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला होता. या चकमकीत गोकूळचा सहभाग होता. रतन कुंजामी याचाही विविध चकमकींत सहभाग होता. सरिता कल्लो हिचा 30 एप्रिलच्या रात्री दादापूर येथे 27 वाहनांच्या जाळपोळीत सहभाग होता. शैला हेडो हिच्यावर चकमकीचे 3, खुनाचा 1 व जाळपोळीचे 3 गुन्हे दाखल आहेत. जरिना होयामी हिच्यावर विविध प्रकारचे 19 गुन्हे आहेत. शैला ऊर्फ राजे मंगळू हेडो, जरिना ऊर्फ शांती दानू होयामी व मीना धुर्वा या तिघीही सुरुवातीला गट्टा दलममध्ये व नंतर भामरागड दलममध्ये कार्यरत होत्या. यासंदर्भात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 1 मे रोजी जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंगस्फोटानंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केल्याने नक्षल्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिवाय पोलिस विभाग राबवीत असलेली नवजीवन योजना, जनजागरण मेळावे या माध्यमातून नक्षल्यांना शरणागती पत्करण्याची प्रेरणा मिळाली. 2019 मध्ये आतापर्यंत 14 नक्षली शरण आले असून, त्यात तीन डीव्हीसींचा समावेश असल्याची माहितीही बलकवडे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व अजय बन्सल उपस्थित होते.
शहीद सप्ताह आजपासून
नक्षल्यांचे दिवंगत नेते चारू मुजुमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नक्षलवादी दरवर्षी 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या आठवड्यात नक्षलवादी विविध चकमकीत ठार झालेल्या आपल्या सहकाऱ्यांची स्मारके उभारून त्यांना श्रद्धांजली वाहतात. शिवाय हिंसक कारवायाही करतात. नक्षल्यांनी विविध भागात यासंदर्भात पत्रके टाकली तसेच बॅनर्स बांधले आहेत. नक्षल्यांचा शहीद सप्ताह रविवार (ता. 28) पासून प्रारंभ होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surrender of six Nakshals with a prize of Rs 32 lakh 50 thousand